राज्यात कोकण विभागाचे काम अव्वल
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 26, 2020
- 762
मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक; 10 लाख 63 हजार 163 कुटुंबांची तपासणी
नवी मुंबई : कोकण विभागात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम गाव पातळीपर्यंत राबविण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी या योजनेचा निश्चित उपयोग होईल, असा विश्वास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केला. आतापर्यंत 10 लाख 63 हजार 163 कुटुंबांची तपासणी करण्यात आली असून कोकण विभागाचे काम अव्वल असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की,वैद्यकीय अधिकार्यांना ट्रीटमेंट करताना काही अडचण असल्यास टास्क फोर्सशी सल्लामसलत करावी. ग्रामपंचायत पातळीवर अधिक लोक सहभागी होतील याकडे लक्ष द्यावे. प्रचार प्रसिद्धीसाठी विशेष प्रयत्न करावेत. शुक्रवारी कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ आणि कोकणातील जिल्हाधिकारी यांच्याशी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे घेतलेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. कोंकण भवन येथे नवी मुंबई पोलीस आयुक्त बीपीनकुमार सिंग, कोंकण पोलीस महानिरीक्षक निकीत कौशिक आदी उपस्थीत होते.
कोकण विभागात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्ये सरासरी 25 टक्के आरोग्य सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. याबाबत मुख्यमंत्री यांनी समाधान व्यक्त केले. स्थानिक पालिकेच्या माध्यमातून घरोघरी तपासणी, सर्वेक्षण आणि मार्गदर्शन करण्यात येत आहे. यासाठी संपूर्ण राज्यात 55 हजार 268 आरोग्य पथके तैनात करण्यात आली असून, काल अखेर 70.75 लाख कुटुंबांची तपासणी करण्यात आली आहे. यात 2.83 कोटी व्यक्तींची तपासणी झाली आहे. 37 हजार 733 संशयितांपैकी 4 हजार 517 कोविड रुग्ण आढल्याची माहिती देण्यात आली.
कोकण विभागात 1 कोटी 92 लाख 72 हजार 065 लोकसंख्या असून, 48 लाख 66 हजार 372 कुटुंब संख्या आहे. यासाठी 7 हजार 425 पथकांची आवश्यता आहे. त्यापैकी 6 हजार 721 पथके नेमण्यात आलेली आहेत. दररोज 2 लाख 17 हजार 594 कुटुंबांना भेटी दिल्या आहेत. आज अखेर ही संख्या 10 लाख 64 हजार 143 एवढी होते. भेटी दरम्यान 1 हजार 403 तापाचे रुग्ण आढळले तर 38 हजार 658 कोरोना सदृष्य आढळून आले आहेत. कोकण विभागात 6 हजार 780 ऑक्सिमिटर आवश्यक आहे. त्यापैकी 6 हजार 420 ऑक्सिमिटर उपलब्ध आहेत. 6 हजार 666 थर्मल स्कॅनरची आवश्यकता आहे. त्यापैकी 6 हजार 602 थर्मल स्कॅनर उपलब्ध आहेत.
कोकण विभागात ‘माझे कुटुंब माझी जाबाबदारी’ मोहिमेअंतर्गत विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले गेले आहेत. त्यात पालघर जिल्हयात वारली पेंटिंग आणि वारली भाषेमध्ये प्रसिध्दी, सिंधुदूर्ग मध्ये दशावताराच्या माध्यमातून प्रसिध्दी, रत्नागिरी जिल्हयात गुडी महोत्सव आणि महापालिकेअंतर्गत 40 जाहिरात फलके, 5 कमाने, 100 बसस्टॉप आणि 75 बसेसवर प्रसिध्दी करण्यात आली आहे. रायगड जिल्हयात पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त पत्रकार परिषदा, कल्याण डोंबिवली महापालिकाअंतर्गत ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
बरे झालेले रुग्ण आणि त्यांची माहिती प्रसार माध्यमांद्वारे सर्वत्र प्रसिद्ध करावी. जनजागृती प्रचार प्रसिद्धीवर अधिक भर द्यावा. सर्व्हे सर्वांसाठी आहे. ही भावना सर्वत्र असावी, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. कोकण विभागात या मोहिमेसाठी स्वयंसेवक म्हणून राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, नेहरु युवा केंद्राचे युवक, स्पर्धापरिक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्था यांची मदत घेतली जात आहे. घरोघरी जाऊन तपासणी, क्लोज कॉन्टॅक्टचा शोध आणि प्रभावी उपाययोजना यामुळे रुग्ण दूप्पटीचा वेग 55 दिवसांवर आला असल्याची माहिती यावेळी राज्यमंत्री, माहिती व जनसंपर्क आदिती तटकरे यांनी दिली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai