अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा अटकेत

आरोपीला 48 तासात अटक करण्यात यश   

नवी मुंबई : तुर्भे स्टोअर्स भागात रहाणार्‍या 12 वर्षीय अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने आपल्या घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन पळून गेलेल्या आरोपीला 48 तासात अटक करण्यात तुर्भे एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. विजय राठोड असे या आरोपीचे नाव असून बलात्कार केल्यानंतर तो उस्मानाबाद जिल्ह्यात पळुन गेला होता. त्याचा कुठल्याही प्रकारचा सुगावा नसताना पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे त्याचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या आहेत.  

या गुह्यातील आरोपी  व त्याने लैंगिक अत्याचार केलेली पिडीत अल्पवयीन मुलगी हे तुर्भे स्टोअर्स मध्ये रहाण्यास आहेत. गत 4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पिडीत मुलगी राठोड याच्या घरासमोरुन जात असताना, त्याने पिडीत मुलीला अडवून तिला जबरदस्तीने आपल्या घरात उचलून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. या प्रकारानंतर पिडीत मुलीचे पालक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्याचे समजल्यानंतर आरोपीने आपला मोबाईल बंद करुन खाजगी ट्रव्हल्स बसने पुण्याच्या दिशेने पलायन केले होते. त्यामुळे तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी आरोपीवर बलात्कारासह पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल करुन तत्काळ सुकापुर टोलनाका तसेच पुणे येथील नियंत्रण कक्षाच्या माध्यमातुन त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पोलिसांच्या हाती लागला नाही. 

त्यामुळे पोलिसांनी आरोपीचे कुटुंबिय व त्याच्या जवळच्या मित्रांची माहिती काढून त्यांच्या मोबाईल फोनवर पाळत ठेवली. याचदरम्यान, आरोपीने आपल्या पत्नीच्या मोबाईलवर अनोळखी मोबाईलवरुन संपर्क साधल्यानंतर पोलिसांनी सदर कॉलचे तांत्रिक विश्‍लेषण केले असता, तो उस्मानाबाद जिह्यात उमरगा येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक तत्काळ उमरगा येथे रवाना झाले. मात्र पोलीस तेथे पोहोचण्यापुर्वीच आरोपीने त्याठिकाणावरुन  लोहार तालुक्यातील होळी गावात पलायन केले. त्याठिकाणी पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, तो गावाबाहेरील एका उसाच्या शेतात लपुन बसला असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी उसाच्या शेतात धाव घेतली. मात्र पोलिसांची चाहुल लागताच त्याठिकाणावरुन देखील विजय राठोड याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, अखेर पोलिसांनी पाठलाग करुन त्याला जेरबंद करुन नवी मुंबईत आणले.  सदरची कारवाई परिमंडळ-1चे पोलीस उपआयुक्त सुरेश मेंगडे, सहाय्यक पोलीस आयुक्त भरत गाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक डोंब, पवन नांद्रे, महिला पोलीस उपनिरिक्षक अर्चना गाढवे व त्यांच्या पथकाने केली.