84.71 तोळे तारण सोने घेऊन ज्वेलर्सचा पोबारा
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 11, 2026
- 26
27 जणांची 1.50 कोटींची फसवणुक
नवी मुंबई ः कोपरखैरणे सेक्टर 19 बी येथील महालक्ष्मी ज्वेलर्सच्या दोन भागीदारांनी 27 जणांनी तारण ठेवलेले 988 ग्रॅम सोने घेऊन दुकान बंद करून पळ काढला आहे. 27 जानेवारी पासून दुकान बंद असून त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याची मागणी फिर्यादी करीत आहेत. यासाठी अनेकदा कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवले गेले. शेवटी आंदोलन केल्यावर पोलिसांना जाग आली आणि त्यांनी या प्रकरणी महालक्ष्मी ज्वेलर्सच्या दोन भागीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
रुपेश गुज्जर आणि सुरेश या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन भागीदाराची कोपरखैरणे सेक्टर 19 बी येथील रांजना देवी प्रसन्न इमारतीत गाला क्रमांक तीन येथे महालक्ष्मी ज्वेलर्स नावाचे दुकान त्यांनी 15 वर्षांपूर्वी सुरु केले होते. या ठिकाणी त्यांची अनेक वर्षांपासून ओळख असलेले गुलचंद चौहान यांनी 25 सप्टेंबरला दागिने गहाण ठेवत 8 लाख रुपयांचे कर्ज घेतले. त्या पैकी चार लाख रुपये 30 ऑक्टोबर पर्यंत फेडण्यात आले. जेवढे पैसे फेडले तेवढ्या किमतीचे दागिने परत मागितले असता त्यांनी टाळाटाळ सुरु केली. 3 फेब्रुवारी पासून दुकानात फेऱ्या मारणे सुरु झाले मात्र दुकान कायम बंद होते. त्यावेळी परिसरात विचारणा केली असता 22 जानेवारी पासून दुकान उघडले गेले नसल्याचे समोर आले असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
ही माहिती हळू हळू अनेकांना कळली. अशा सुमारे तीस जणांनी तीन ते चार तारखेपासून महालक्ष्मी ज्वेलर्स विरोधात तक्रारी करणे सुरु केले. मात्र त्यांच्या विरोधात कोपरखैरणे पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ करणे सुरु केले. दबाव वाढल्यावर पोलिसांनी अगोदर अर्ज करा असे फर्मान सोडले त्यामुळे या बाबत चार तारखेला काही फिर्यादींनी अर्ज दाखल केला. मात्र तरीही पोलिसांनी काहीही हालचाल न केल्याने कोपरखैरणे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उमटले गेले. या प्रकरणी शनिवारी 7 तारखेला पोलीस उपायुक्त पंकज डहाने यांच्यापर्यंत हे प्रकरण पोहचले त्यांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. तरीही कोपरखैरणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. शेवटी रविवारी 30 पेक्षा अधिक लोकांनी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले. तसेच सोमवार पर्यंत गुन्हा दाखल केला नाही तर अधिक उग्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला. त्यानंतर खैरणे पोलिसांना जाग आली आणि त्यांनी एकूण 27 जणांच्या फसवणूक प्रकरणी रुपेश गुज्जर आणि सुरेश यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
- सोन्याचा वाढत्या दराने नियत बिघडली
सोने गहाण ठेवताना सोन्याच्या किमतीच्या 90 टक्के पर्यंत कर्ज दिले जात होते. मात्र गेल्या काही महिन्यापासून सोन्याचे भाव दीड पटींनी वाढले त्यात अनेक ग्राहकांनी बहुतांश पैसे फेडले असल्याने वाढत्या सोन्याच्या दरानुसार सोने परत देण्यापेक्षा फसवणुकीत जात नफा पाहून सोनाराने हे कृत्य केल्याचा दावा अनेकांनी केला. पोलीस दफ्तरी सोने जेव्हा विकत घेतले तो दर पकडला जात असल्याने हि रक्कम 1 कोटी 44 लाख झाली मात्र बाजार भावानुसार किमान 6 ते सात कोटी रुपयांचे सोने घेऊन संशयित आरोपी फरार झाल्याचा दावा अनेक तक्रारदारांनी केला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai