अनधिकृत इमारतीवर हातोडा

नवी मुंबई : अनधिकृत बांधकामांविरोधात नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने धडक मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार, तुर्भे विभागात कोपरी गावात नव्याने अनधिकृत बांधकाम सुरू असलेल्या एका चारमजली इमारतींवर शुक्रवारी दुपारी कारवाई करण्यात आली. 

सध्या महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे लक्ष कोरोनाच्या नियंत्रणाकडे लागले आहे. याचाच फायदा घेत, नवी मुंबईत अनधिकृत बांधकामांना ऊत आल्याचे चित्र पाहावयास मिळते. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या आदेशानुसार, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अमरीश पटनिगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरी गावातील सेक्टर 26 येथील भूखंड क्र.50 ए, येथे बांधकाम सुरू असलेल्या अनधिकृत इमारतीवर कारवाई करण्यात आली. सिडकोच्या अतिक्रमण विभागाकडून गावठाणात नवीन अनधिकृत बांधकामांचे पोलीस बंदोबस्तात सर्वेक्षण सुरू असल्यामुळे, भूमाफिया आणि विकासक दलालांचे धाबे दणाणले आहेत.