स्थायी समिती व स्वीकृत नगरसेवक नेमणूकीसाठी चुरस
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 06, 2026
- 346
नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौर यांची नियुक्ती झाल्यानंतर आता स्थायी समिती सदस्य आणि स्वीकृत नगरसेवक नेमणुकीसाठी सर्वच पक्षात चुरस वाढली आहे. यापुर्वी 20 नगरसेवकांमागे 1 स्वीकृत नगरसेवक नेमण्याची असलेली तरतूद यावेळी राज्य शासनाने 10 नगरसेवकांमागे 1 केल्याने स्वीकृत नगरसेवकांची संख्या दुप्पट झाली आहे. त्यामुळे सर्वच पक्षात स्थायी समिती सदस्यांसह स्वीकृत नगरसेवक म्हणून नेमणुक करुन घेण्यासाठी कमालीची चढाओढ लागली आहे.
मुंबई वगळता नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, वसई-विरार महापालिकांच्या महापौर-उपमहापौर नियुक्त्या पुर्ण झाल्या आहेत. त्यानंतर आता येणाऱ्या सर्वसाधारण सभेत पक्षनिहाय स्थायी समिती सदस्य व स्वीकृत नगरसेवक सदस्य, सभागृहनेते, विरोधी पक्षनेता यासाठी नेमणुका होणार आहेत. स्थायी समिती ही संबंधित महापालिकांची महत्वाची समिती असून या समितीमध्ये सर्वच निविदांना मंजुरी देण्यात येते. त्यामुळे या समितीवर नेमणुक होण्यासाठी सर्वच नगरसेवक गुडघ्याला बाशिंग बांधून असतात. ही नेमणुक सरसकट न होता पक्षीय बलानुसार होत असून त्यामध्ये वर्णी लागावी म्हणून सर्वच पक्षातील ईच्छुक नगरसेवकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
स्थायी समितीनंतर स्वीकृत नगरसेवकपदी नेमणुका होणार असून या नेमणुका नव्याने बनवलेल्या नियमानुसार होणार आहेत. यापुर्वी 20 नगरसेवकांमागे 1 स्वीकृत नगरसेवक नेमण्याची तरतूद होती. परंतु, यावेळी सर्वच पक्षात ईच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असल्याने शासनाने हा आकडा 10 नगरसेवकांमागे 1 स्वीकृत नगरसेवक केल्याने स्वीकृत नगरसेवकांची संख्या दुप्पट झाली आहे. त्याअनुषंगाने आपली वर्णी लागावी म्हणून ज्या नगरसेवकांना तिकट मिळाले नाही किंवा ज्या दिग्गज नगरसेवकांना पराभव पत्करावा लागला त्या सर्व ईच्छुकांनी देव पाण्यात ठेवले आहेत. शिवसेना अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी पराभूत उमेदवारांना स्वीकृत नगरसेवक म्हणून नेमणुक करणार नाही अशी ठाम भुमिका घेतल्याने पराभूत उमेदवार नाउमेद झाले आहेत. सर्वच पक्षांनी स्वीकृत नगरसेवकांची नेमणुक करताना सुशिक्षित व शहराच्या समस्यांबद्दल जाण असलेल्या नागरिकांची वर्णी लावावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे येणाऱ्या सर्वसाधारण सभेत या पदांवर कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- सभापतीसाठी रामचंद्र घरत यांना पसंती?
भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक रामचंद्र घरत यांची स्थायी समिती सभापतीपदी नियुक्ती व्हावी म्हणून भारतीय जनता पक्षाचे मुळ कार्यकर्ते सक्रिय झाले असून त्यांनी आपल्या भावना पक्षश्रेष्ठींना कळवल्या आहेत. पक्षात फुट पडल्यावरही जिल्हाध्यक्ष म्हणून रामचंद्र घरत यांनी निष्ठेने बेलापुर व ऐरोली मतदारसंघात काम केले असून त्यांच्या श्रमाचे फळ त्यांना द्यावे अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी विद्यमान जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांच्याकडे व्यक्त केल्याचे सुत्रांकडून कळत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai