टेंडर देण्याच्या बहाण्याने 23 लाखांचा गंडा

नवी मुंबई : कारागृह अधिकारी असल्याची बतावणी करीत एकाची 23 लाखांची फसवणूक करण्यात आल्याचे प्रकरणी उघडकीस आले आहे. ही फसवणूक करणार्‍या या बोगस अधिकार्‍यासह त्याच्या पत्नीचा शोध सुरू आहे. तुरुंगात लागणार्‍या वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी निविदा मंजूर करून देतो असे सांगून ही फसवणूक झाली आहे.

प्रवीण कांबळे आणि सुजाता कांबळे अशी आरोपींची नावे आहेत. भास्कर चिचूलकर यांची फसवणूक झाली आहे. प्रवीण आणि भास्कर यांची  नातेवाईकांच्या माध्यमातून ओळख झाली होती. प्रवीण यांनी आपण तळोजा कारागृहात सहाय्यक निरीक्षक असल्याची ओळख करून दिली होती. काही दिवसांनी ठाणे कारागृहात पाण्यासह अन्य वस्तूंचा पुरवठा करण्याच्या निविदा निघणार आहेत. तुमची इच्छा असेल तर काम करून देतो असे प्रवीण याने भास्कर यांना सांगितले. हा व्यवहार डी आय इंटरप्राइजेस या कंपनीमार्फत होणार असल्याचे सांगत सन 2018 मध्ये अनामत रक्कम म्हणून 23 लाख रुपये घेतले. ही कंपनी सुजाता हिच्या नावावर असल्याचे तपासात समोर आले. कंपनीने काही दिवस पाणी पुरवले. नंतर डिसेंबर 2018 मध्ये निविदा निघणार असल्याने सध्या पाणी नको असे सांगण्यात आले. त्यानंतरही  कांबळे याने पाणी घेणे बंद करुन चिचूलकर यांनी टाळण्यास सुरुवात केली. यामुळे भास्कर चिचूलकर यांना शंका आल्याने त्यांनी तळोजा कारागृहात चौकशी केली असता असा कोणी व्यक्ती काम करत नसल्याचे समोर आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी कामोठे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आरोपी दाम्पत्याने यापूर्वी बेकरी उत्पादन पुरवठादाराचीही फसवणूक केल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडून आणखी कोणाची फसवणूक केली असेल तर कामोठे पोलिसांची संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सध्या हे दाम्पत्य फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत,अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी दिली.