धावत्या ट्रेनमधून तरुणीला फेकले

नवी मुंबई : धावत्या लोकल ट्रेनमधून वाशी खाडी पुलावर ढकलून देत तरुणीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची संतपाजनक घटना समोर आली आहे. प्राथमिक तपासात या तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे आढळून आले आहे. त्यानुसार वाशी रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल करुन या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.

या घटनेतील जखमी तरुणी टिटवाळा इथे राहत असून ती पवईला घरकाम करते. ती आठवड्यातून एकदा आपल्या घरी जाते. त्यानुसार मागील शनिवारी (19 डिसेंबर) संध्याकाळी आपल्या घरी टिटवाळा येथे गेली होती. त्यानंतर रविवारी (20 डिसेंबर) संध्याकाळी ती पवई इथे आपल्या कामावर येण्यासाठी रवाना झाली. परंतु त्यानंतर तिचा कुटुंबियांशीसंपर्क झाला नव्हता. मात्र मंगळवारी पहाटे सहाच्या सुमारास ही तरुणी वाशी खाडी पुलावर अप रेल्वे मार्गाच्या रुळालगत जखमी अवस्थेत मोटरमनच्या निदर्शनास आली होती. मोटरमनने याबाबतची माहिती स्टेशनमास्तरला दिल्यानंतर वाशी रेल्वे पोलीस आणि आरपीएफच्या जवानाने जखमी तरुणीला तत्काळ वाशी येथील पालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तरुणीवर प्रथमोपचार करुन तिला मुंबईतील जे जे रुग्णालयात पाठवले. सध्या या तरुणीची प्रकृती स्थिर असून ती अद्याप बोलण्याच्या अवस्थेत नाही. प्राथमिक तपासात तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे आढळून आले आहे. फॉरेन्सिकच्या अहवालानंतर तरुणीवर लैंगिक अत्याचार झाला की नाही हे स्पष्ट होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

याबाबत विधानपरिषदेच्या उपसभापती ना.डॉ.नीलम गोर्‍हे यांनी तात्काळ दखल घेतली आहे. डॉ. गोर्‍हे यांनी रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून घटनेची सविस्तर माहिती घेतली. तसेच, पोलीस महासंचालकांना पत्र लिहून मदत आणि समुपदेशन करण्याच्या सूचना दिल्या.