नाईकांच्या ‘दिव्य’ स्वप्नाला धक्का

वाशीतील माजी नगरसेवक वैभव व दिव्या गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

नवी मुंबई ः नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराचे जोरदार वारे नवी मुंबईत वाहू लागले आहे. भाजपातून घरवापसी व इतर पक्षात इनकमिंग होऊ लागल्याने नाईकांच्या गडाचे बुरुज ढासळू लागले आहेत. गवते कुटुंबियांच्या पक्षांतरानंतर वाशीतील वैभव व दिव्या गायकवाड या दाम्पत्यांनी नवी मुंबई महापालिकेची निवडणुकी राष्ट्रवादीतून लढण्याचा निर्णय घेतला आहे. अजून किमान सहा नगरसेवकांना घरवापसीची ओढ लागल्याने नाईकांच्या ‘दिव्य’ स्वप्नाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

महापालिकेच्या निवडणुकीची चाहुल लागताच पक्षांतराची लाट आता नवी मुंबईत धडक देऊ लागली आहे. गत मंगळवारी दिघा येथील गवते कुटुंबियांनी गणेश बंधन झुगारुन शिवसेनेत प्रवेश केला. तर आज (5 जानेवारी) वाशीतील माजी नगरसेवक वैभव व दिव्या गायकवाड यांनीही राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित यांची भेट घेऊन आपण आगामी पालिका निवडणुका राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातून लढणार असल्याचे जाहीर केले. त्यांच्या या निर्णयामुळे  गणेश नाईक यांचे पालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्याच्या ‘दिव्य’ स्वप्नाला धक्का बसला असून त्यांची सत्ता राहणार की जाणार हे येणार्‍या निवडणुकांवरच अवलंबून आहे. 

वैभव गायकवाड यांनी 2010 साली झालेल्या नवी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या घड्याळ या चिन्हावर सर्वप्रथम निवडणूक लढविली व ते विजयी झाले. 2015 साली झालेल्या निवडणुकीत त्यांची पत्नी दिव्या गायकवाड यांना प्रभागातील नागरिकांनी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या चिन्हावर भरघोस मतांनी निवडून दिले. 2019 मध्ये पालिकेवर सत्ता असणार्‍या माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनी आपल्या 42 समर्थक नगरसेवकांसह भाजपात प्रवेश केला. सभागृहातील अभ्यासू सदस्य म्हणून ओळख असणार्‍या दिव्या गायकवाड यांनी यापुर्वी नाईकांनी घेतलेल्या काही निर्णयांमुळे नाराजी व्यक्त केली होती. आता 2010 आणि 2015 साली झालेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांप्रमाणे आगामी निवडणुकाही आम्ही राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातून लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे गायकवाड यांनी प्रसिद्धपत्रकाद्वारे कळविले  आहे. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि देशाचे द्रष्टे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आशिर्वाद, मार्गदर्शनाने यापुढील काळातही लोकशाही, धर्मनिरपेक्ष, समता, बंधुता या मुल्यांवर विश्वास ठेवत मार्गक्रमण करण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न करत राहू हा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.