लसीकरणात कोव्हॅक्सिन लसीचा समावेश

नवी मुंबई ः महानगरपालिकेच्या वतीने शासन निर्देशानुसार 16 जानेवारी पासून लसीकरणास सुरुवात झालेली असून सद्यस्थितीत कार्यान्वित 37 लसीकरण केंद्रांवर 51,424 नागरिकांना लसीकरण करण्यात आलेले आहे. 1 मार्चपासून ज्येष्ठ नागरिक व 45 वर्षावरील सहव्याधी (कोमॉर्बीड) असणार्‍या नागरिकांना लसीकरण सुरु करण्यात आलेले आहे. शासनामार्फत लसीकरणासाठी उपलब्ध झालेल्या कोव्हीशिल्ड लसीव्यतिरिक्त आजपासून कोव्हॅक्सिन लसीचा समावेश झालेला आहे.

सध्या नवी मुंबई महानगरपालिकेची वाशी, नेरूळ व ऐरोली येथील 3 रूग्णालये, तुर्भे येथील माता बाल रूग्णालय तसेच 18 नागरी आरोग्य केंद्रे अशा 22 ठिकाणी कोव्हीड 19 लसीकरण केंद्रे सुरू असून तेथे विनामूल्य लसीकरण करण्यात येत आहे. यामध्ये नागरिकांना आपल्या सोयीच्या वेळी लस घेता यावी याकरिता महानगरपालिकेच्या तिन्ही रूग्णालयांमध्ये अहोरात्र 24 तास लसीकरण सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच माता बाल रूग्णालय तुर्भे याठिकाणी सकाळी 9 ते सायं. 5 या वेळेत लसीकरण करण्यात येत आहे. याशिवाय 18 नागरी आरोग्य केंद्रांमध्ये सोमवार, बुधवार, गुरूवार व शुक्रवार असे आठवड्याचे 4 दिवस सकाळी 9 ते सायं. 5 या वेळेत लसीकरण करण्यात येत आहे. याशिवाय 15 खाजगी रूग्णालयांमध्येही लसीकरण करण्यात येत असून तेथे प्रतिडोस रू. 250ॅॅॅॅॅॅॅॅॅॅ इतक्या शासनमान्य दराने लसीकरण केले जात आहे.

आजपासून महापालिका क्षेत्रातील 15 खाजगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस दिली जाणार असून 17 मार्चपासून महानगरपालिकेच्या 22 लसीकरण केंद्रांवरही कोव्हॅक्सीन लस दिली जाणार आहे. प्रत्येक लाभार्थ्याने लसीचे 2 डोस घेणे आवश्यक असून ज्या लसीचा पहिला डोस घेतला आहे त्याच लसीचा दुसरा डोस घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिकेने नियोजन केलेले आहे. आजतागायत झालेल्या एकूण 51,424 लसीकरणामध्ये खालीलप्रमाणे लसीकरण झालेले आहे. लस घेतलेल्या कोणत्याही व्यक्तीस मोठ्या प्रमाणात त्रास झालेला नसून ही लस पूर्णत: सुरक्षित आहे याची नोंद घेऊन नागरिकांनी लसीकरणासाठी आपला क्रमांक येईल तेव्हा अवश्य लस घ्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

        पहिला डोस      दुसरा डोस 
पहिला टप्पा 17973     9531
दुसरा टप्पा 10594                  1904
तिसरा टप्पा 22857 
एकूण 51424