पुन्हा कार्यालयात 50 टक्के उपस्थिती

कोरोनासंदर्भात राज्य सरकारचे नवे नियम

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याचं पहायला मिळत आहे. कोरोना बाधितांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत आता राज्य सरकारने काही निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता महाराष्ट्रातील सर्व खासगी कार्यालये आणि आस्थापनांत केवळ 50 टक्के कर्मचार्‍यांच्या उपस्थितीतच काम सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, यामधून आरोग्य, अत्यावश्यक सेवा, मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळण्यात आले आहेत. 

केवळ कार्यालयेच नाही तर राज्यातील नाट्यगृहे आणि ऑडिटोरिअममध्ये सुद्धा 50 टक्क्यांहून अधिक उपस्थिती नसावी असेही यामध्ये म्हटलं आहे. तसेच नाट्यगृह किंवा सभागृहांमध्ये प्रवेश करताना चेहर्‍यावर मास्क असणे आवश्यक, मास्क शिवाय प्रवेश देण्यात येणार नाही. प्रवेश करताना शरीराचे तापमान तपासण्यात यावे आणि थर्मल स्क्रिनिंग होणार. ताप असलेल्या व्यक्तींना प्रवेश देण्यात येणार नाही. सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांच्या विभाग व कार्यालय प्रमुखांनी कोविड परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयातील कर्मचार्‍यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्चित करावे असेही आदेशात म्हटलं आहे. नाट्यगृहे आणि सभागृहांत 50 टक्क्यांहून अधिक उपस्थिती नसावी. तसेच यांचा उपयोग हा राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक मेळाव्यांसाठी करता येणार नाहीये असेही सरकारने स्पष्ट केले आहे. सामाजिक अंतर राखणे सोयीस्कर होण्याकरिता उत्पादन क्षेत्रास शिफ्टमध्ये वाढ करण्याची मुभा स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने घेता येईल असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

कोविड संदर्भात राज्य सरकारने लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचंही सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे. शासनाने काढलेला हा आदेश 31 मार्च पर्यंत अंमलात येणार असून त्यानंतर पुढील आदेश निर्गमित करण्यात येतील, असेही या आदेशात म्हटले आहे.