शहरात नागरिकांचा विनामास्क मुक्तसंचार

तिसर्‍या लाटेला आमंत्रण; वेळीच आवर घालण्याची गरज

नवी मुंबई : कोरोना रूग्णसंख्येत घट झाल्याने राज्य सरकारने आखून दिलेल्या अनलॉकच्या दुसर्‍या टप्प्यामध्ये नवी मुंबई शहर समाविष्ट झाले आहे. त्यामुळे महापालिकेने नियमानुसार कठोर निर्बंध शिथील केले आहेत. परंतू नागरिक बिनधास्त झाले असून बाजारपेठांमधील त्यांचा विनामास्क वावर वाढला आहे. त्यामुळे एकप्रकारे नागरिक कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला आमंत्रणच देत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

काही महिन्यांपूर्वी आवाक्याबाहेर गेलेली कोरोना रूग्णसंख्या लॉकडाऊन व प्रशासनासह कोविड योद्धांच्या अथक प्रयत्नांमुळे आटोक्यात आली. अर्थचक्र चालू राहावे तसेच कोरोना नियंत्रणात रहावा यासाठी जून महिन्याच्या सुरवातीपासून राज्य सरकारने टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्याचे जाहिर केले. त्यानुसार 5 टप्प्यांमध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरू केली. नवी मुंबई शहर दुसर्‍या टप्प्यात येत असल्यामुळे बर्‍यापैकी निर्बंध शिथील करण्यात आले. परंतू यामुळे नागरिक बिनधास्त झाले आहेत. कोरोना सुरक्षा नियम नागरिकांकडून पायदळी तुडविण्यात येत आहेत. सोशल डिस्टसिंगचा शहरात फज्जा उडाला असून नागरिकांचे मास्क वापरण्याकडे दुर्लक्ष होत आहे. वाशी, कोपरखैरणे, ऐरोली, नेरूळ  मधील बाजारपेठेमध्ये नागरिकांची गर्दी वाढत चालली आहे. तिसर्‍या लाटेची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात असली तरी नागरिक त्याकडे गांर्भीयाने पाहत नसल्याचे चित्र दिसत आहे. संभाव्य तिसर्‍या लाटेत लहानग्यांना धोका असल्याची भिती असली तरी पालक लहान मुलांनासुद्धा सहज बाहेर फिरवत आहेत. पाच वर्षाखालील मुलांना मास्क नको असे केंद्रिय आरोग्यमंत्रालयाने गुरुवारी स्पष्ट केले असले तरी आपल्या बालकांची काळजी घेणे पालकांचे कर्तव्य असल्याने बाहेर मुक्त संचार करणे धोक्याचे ठरणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.

वाशीतील मिनी सीशोअर फुलले

  • वाशीमधील मिनी सीशोअरला नागरिकांची गर्दी वाढत असून येथेही नागरिक सुरक्षा नियम धाब्यावर बसवत आहेत. येथे येणारे नागरिक विनामास्क संचार करत आहेत. नागरिकांचा हा अतिउत्साह कोरोना वाढीला आमंत्रण देणार ठरु शकतो. त्यामुळे यासर्व प्रकारांकडे प्रशासनासोबत नागरिकांनीसुद्धा गांभीर्यांने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.