वाहनचोरी करणार्‍या सराईत चोरट्याला अटक

नवी मुंबई : एपीएमसी पोलिसांनी वाहन चोरी करणार्‍या एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. संतोष डोंगरे असे या चोरट्यांचे नाव असून त्याने नवी मुंबई सह इतर भागातून 8 वाहने चोरल्याचे तपासात आढळून आले आहे. त्यानुसार पोलिसांनी या चोरट्यांकडून चोरीची 8 वाहने जप्त केली आहेत.

या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी संतोष डोंगरे हा रबाले भागात राहण्यास असून तो  वाहन चोरी करण्यात पटाईत असल्याची माहिती एपीएमसी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार एपीएमसी पोलिसांनी  संतोष डोंगरे याला ताब्यात घेऊन त्याची अधिक चौकशी केली असता, त्याने एपीएमसी च्या हद्दीतून-2, रबाले-2,  आणि तुर्भे, एनआरआय व डोंबिवली या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी 1 अशी 8 वाहने चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी  संतोष डोंगरे याला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी त्याची अधिक चौकशी करून त्याने विविध भागातून चोरलेले मोटारसायकल , रिक्षा , कार अशी 8 लाख रुपये किमतीची 8 वाहने जप्त केली.