स्वपक्षीय नेत्यांकडूनच महिलांना डावलले जातं!

आमदार मंदा म्हात्रे यांची नाराजी

नवी मुंबई : बेलापुर विधानसभा मतदार संघाच्या भाजप आमदार मंदाताई म्हात्रे यांनी राजकारणात स्वपक्षीय नेत्यांकडूनच महिलांना डावलल जातं, अशी खंत एका कार्यक्रमात व्यक्त केली. महत्त्वाचं म्हणजे काँग्रेस नेत्या आणि महिला बाल विकासमंत्री यशोमती ठाकूर यांच्यासमोरच मंदा म्हात्रे यांनी ही खंत बोलून दाखवली. म्हात्रे यांच्या नाराजीमुळे नवी मुंबई भाजपमध्ये अंतर्गत वाद असल्याचे समोर आले आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 

एका कार्यक्रमात आमदार मंदाताई म्हात्रे म्हणाल्या, राजकारणात स्वपक्षीय नेत्यांकडूनच महिलांना डावलल जातं. दोनदा निवडून येऊनही मला आजही संघर्ष करावं लागतोय.  एखादी स्त्री चांगलं काम करायला लागली की पुरुष नेते पंख छाटायला सुरुवात करतात. आज ही महिलांची कामे झाकून टाकण्याचं काम केलं जातं. मी कुणालाच घाबरत नाही. मला कोणालाही घाबरण्याचं कारण नाहीये. मला तिकीट दिलं किंवा नाही दिलं तरी मी लढणार, असा निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखवला. काम करताना, कुठलीही भीती बाळगायची नाही, फळाची अपेक्षा बाळगायची नाही, आपण आपलं काम करत राहायचं, असं मंदा म्हात्रे म्हणाल्या. भाजपात महिलांचा सन्मान होत नसल्याची टिकाही त्यांनी केली. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये नवी मुंबईच्या राजकारणात कोणत्या घडामोडी घडणार आहेत हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.