Breaking News
ठाणे : आंबा व भेंडी पिक उत्पादक शेतकर्यांना निर्यातीसाठी आवश्यक नोंदणी प्रक्रियेसंदर्भात जिल्हा कृषी विभाग व कोकण हापूस आंबा उत्पादक व उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेच्या माध्यमातून येत्या 28 सप्टेंबर रोजी शहापूरमध्ये प्रशिक्षण व नोंदणी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी दिली आहे.
ठाणे जिल्ह्यातून भेंडी व आंबा पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. युरोपियन व इतर देशांना निर्यातीकरिता प्रामुख्याने कीडनाशक उर्वरित अंश व कीड रोगमुक्त उत्पादनाची हमी देणे आवश्यक असल्यामुळे निर्यात होणारे ताजी फळे व भाजीपाला यांचे फायटोस्थनीटरी प्रमाणीकरणासाठी एक प्रणाली तयार केली आहे. ठाणे जिल्ह्याला हापूस आंब्याला भौगोलिक मानांकन मिळालेले आहे. त्या अनुषंगाने सर्व हापूस आंबा उत्पादक व विक्रेते यांनी त्याची नोंदणी करणे आवश्यक आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील शेतकर्यांना नोंदणीसाठी रत्नागिरी येथील कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रते सहकारी संस्थेच्या कार्यालयात जावे लागत होते. शेतकर्यांची ही अडचण ओळखून जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या पुढाकाराने शहापूरमधील सत्यधर्म आश्रम वाफेपाडा येथे मंगळवार, दि. 28 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता शेतकरी प्रशिक्षण व नोंदणी मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात शेतकर्यांची नोंदणी प्रक्रिया जागेवर पूर्ण केली जाणार आहे.
या नोंदणीसाठी शेतकर्यांनी त्यांच्या हापूस आंबा लागवड असलेल्या जमिनीचे 7/12 चे (मागील 3 महिन्यातील चालतील) उतारे. बागेच्या जमिनीचा नकाशा (मूळ अभिलेखाची झेरॉक्स ज्यावर बागेतील कलमांची संख्या, विहीर किंवा बोरवेल, घर वीज जोडणी यापैकी जे असेल ते हाताने नोंद करून चालेल किंवा पूर्ण हाताने काढलेला पण चालेल). निवडणूक ओळखपत्राची (इलेक्शन) छायाकिंत प्रत किंवा वाहन परवान्याची छायाकिंत प्रत, एक पासपोर्ट व सोबत शुल्काच्या रकमेचा धनादेश (कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्था मर्यादित) किंवा रोख रक्कम घेऊन यावे. सन 2021-22 मध्ये शेतकर्यांच्या बागेची नोंदणी प्रक्रिया सुरु झालेली असल्याने जास्तीत जास्त शेतकर्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन माने यांनी केले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai