Breaking News
पालकमंत्री छगन भुजबळ ; वडपे ते गोंदे आणि वडपे ते मुलुंड टोल नाका परिसरातील रस्त्यांच्या कामांचा आढावा
मुंबई : नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीची कामे सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी तात्काळ पूर्ण करावीत, टोल नाका परिसरातील रस्त्यांची कामे विहित वेळेत पूर्ण केली नाही तर संबधित यंत्रणेवर कारवाई करण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले.
पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मंत्रालयातील दालनात राष्ट्रीय महामार्ग क्र. 3 वडपे ते गोंदे आणि वडपे ते मुलुंड टोलप्लाझा या रस्त्याची दुरावस्था, वाहतुक कोंडीच्या उपाययोजनांबाबत बैठक आयोजित केली होती. यावेळी ते म्हणाले, नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत दुरावस्था झाली असून निकृष्ट रस्त्यांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. टोल नाक्यांची कामे करताना सर्व रस्ते वाहतूक तसेच कार्यान्वयीन यंत्रणांनी आपल्या कामांत समन्वय ठेवावा. पावसामुळेदेखील या रस्त्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. वडपे ते गोंदे आणि वडपे ते मुलुंड टोल प्लाझा या परिसरात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. स्थानिक यंत्रणांनी आपल्या कार्यक्षेत्रातील कामांची स्वत: पाहणी करावी व कामांना तात्काळ गती द्यावी.
यावेळी समीर भुजबळ म्हणाले, मुलुंड टोल नाक्यापासून वाहतूक कोंडी होत आहे. या कार्यक्षेत्रातील रस्तेविकास यंत्रणांनी याबाबत प्रत्यक्ष घटनास्थळी जावून पाहणी करावी. जेणेकरून नागरिकांचा रोष आहे तो लक्षात येईल. वारंवार खराब होणार्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात यावे. जेणेकरून विनाअडथळा वाहतुक कोंडीशिवाय सुरळीत सुरू राहील. आगामी दहा वर्षात होणारे रस्ते तसेच या परिसरातून करण्यात येणार्या रस्त्यांचे नियोजन देखील सर्व रस्ते विकास यंत्रणांनी आत्तापासून करावे जेणेकरून या परिसरातून होणार्या वाहतूकीचे नियोजन सुयोग्यरित्या करता येईल.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News
Aajchi Navi Mumbai