Breaking News
भाजपचा दिल्ली महापालिका निवडणुकीचा पॅटर्न महाराष्ट्रात
मुंबई : देशात धक्कादायक निर्णय घेण्यास प्रसिद्ध असलेले भाजपचे चाणक्य अमित शहा यांनी दिल्ली महापालिका निवडणुकीचा पॅटर्न महाराष्ट्रात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिका व राज्याची विधानसभा निवडणुक एकत्र घेतल्यास शिवसेनेच्या दोन्ही गटांना निवडणुकांवर लक्ष देता येणार नाही व त्यामुळे मुंबई पालिकेसह विधानसभेवर भाजपची सत्ता आणण्याची रणनिती आखल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे.
अमित शहा व देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला धक्का देवून त्यांचे सरकार घालवल्यानंतर महाराष्ट्रात व मुंबई महापालिकेवर स्वबळावर सत्ता आणण्याची तयारी भाजपने सुरु केली आहे. केंद्रिय मंत्र्यांना व भाजपच्या दिग्गज नेत्यांना महाराष्ट्रातील विधानसभा मतदार संघ त्यांनी वाटून दिले आहेत. संबंधितांनी त्या-त्या मतदार संघात जनसंपर्क वाढविला आहे. सेनेच्या दोन्ही गटांना कायद्याच्या लढाईत गुंतवून भाजपने राज्यात स्वबळावर सत्ता आणण्याची तयारी सुरु केल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेतील बंडखोर आमदारांबद्दल प्रचंड नाराजी स्थानिकांमध्ये असून त्यांना संभाव्य निवडणुकीत तिकीट न देण्याचे संकेत मिळत आहेत.
उद्धव ठाकरे प्रणित शिवसेनेने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी विविध पक्षांची मोट बांधण्यास सुुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर, मराठा महासंघ व संभाजी बिग्रेड यांच्याशी मतदार संघाबाबत चर्चा सुरु केली आहे. दरम्यान, परप्रांतियांची मते मिळवण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी तेजस्वी यादव यांची बिहार येथे भेट घेतल्याचे बोलले जात आहे. पालिका निवडणुकीत शिंदे व उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार उभे राहणार असल्याने त्याचा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे.
बंडखोरीच्या धक्क्यातून शिवसेना अजून सावरली नसून एकाचवेळी विधानसभा व मुंबई महापालिका निवडणुका झाल्यास ठाकरे गटाला या दोन्ही निवडणुकांना एकाचवेळी सामोरे जाणे अवघड जाईल असा भाजपचा होरा आहे. अशाचपद्धतीने दिल्लीची निवडणुक गुजरात सोबत झाल्याने अरविंद केजरीवाल यांना म्हणावे तसे लक्ष दोन्हीकडे देता न आल्याने दिल्ली महापालिका निवडणुकीत अपेक्षेएवढे यश मिळाले नाही. शिवसेनेचा जीव हा मुंबई महापालिकेत अडकला असल्याने महापालिका ताब्यात आल्यास शिवसेनेला तो मोठा फटका बसेल असे गणित भाजपचे आहे. शिंदे-फडणवीस सरकारने मुंबई महापालिका क्षेत्रात 1700 कोटी रुपये खर्च करुन मुंबईचे सौंदर्यीकरण करण्याचा प्रकल्प नुकताच हाती घेतला आहे. त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेचे लेखापरिक्षण सीएजी मार्फत करण्याचे आदेश देवून सेनेची धाकधूक वाढवली आहे. हा अहवाल येत्या महिन्यात सादर होण्याची शक्यता असल्याने त्याचा वापर पालिका निवडणुकीसाठी करण्याची शक्यता आहे. समृद्धी महामार्गाचे उद्घाटन करुन विदर्भ-मराठवाड्यातील मतदारांशी जवळीक वाढवली आहे. पालिकेसोबत विधानसभा निवडणुक घेतल्यास शिवसेनेला त्यांच्या मागील विजयी जागांवर उमेदवार मिळणार नाहीत आणि शिवसेनेच्या दोन्ही गटात मतविभागणी होऊन भाजपला राज्यात एकहाती सत्ता आणणे सोयीचे होईल.
या सर्व पार्श्वभुमीवर विधानसभा व मुंबई महापालिका निवडणुक एकत्रित घेणे भाजपच्या फायद्याचे असल्याचेे भाजपच्या चाणक्यांनी राज्यातील नेत्यांना पटवून दिल्याचे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीपुर्वी महाराष्ट्रात एकहाती सत्ता असणे भाजपसाठी सोईचे राहणार आहे. त्यादृष्टीने भाजपचे स्थानिक नेते कामाला लागले असून सेनेला मुंबई महापालिका व विधानसभा निवडणुका एकत्रित घेवून कात्रजचा घाट दाखविण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai