अदानीवर नगरविकास विभागाची असीम कृपा
- by संजयकुमार सुर्वे
- Jan 23, 2026
- 280
सिडकोला पालिका क्षेत्रात बांधकाम परवानगी देण्याचे तुघलकी फर्मान
मुंबई ः राज्याचा नगरविकास विभाग विकासकांच्या ओंजळीने पाणी पित असल्याचे त्यांनी गेल्या काही वर्षात घेतलेल्या निर्णयावरुन दिसत आहे. नगरविकास प्रधान सचिवांनी पालिका क्षेत्रात बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार सिडकोला दिल्याने नवी मुंबईत संतापाची लाट उसळली आहे. नुकतेच मंत्री गणेश नाईक यांनी एफएसआय वरुन नगरविकास विभागातील आयएएस अधिकारी निर्बुद्ध आहेत का? असा घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे, महापौर निवडीनंतर नगरविकास विरुद्ध स्थानिक स्वराज्य संस्था हा वाद चिघळण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, हा निर्णय अदानीवरील असीम प्रेमापोटी नगरविकास विभागाने घेतल्याची चर्चा मंत्रालयात आहे.
महापालिका क्षेत्रात कोणतेही अधिकार नसताना सिडकोने मेसर्स मेस्त्री कंस्ट्रक्शन्स यांना नेरुळ सेक्टर 60 मधील पॉकेट डी आणि ई येथे बांधकाम परवानगी दिल्याची बाब 2021 साली ‘आजची नवी मुंबई’ ने सर्वप्रथम उघडकीस आणली होती. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या पालिकेने याबाबत सिडकोकडे खुलासा मागितला होता. सदर गृहप्रकल्प हा अदानी समुहाचा असल्याने सिडकोने ही बांधकाम परवानगी दिल्याची चर्चा नवी मुंबईत होती. दरम्यान, त्यावेळी महापालिकेत प्रशासकाची सत्ता असल्याने याबाबत कोणतीही ठोस भुमिका महापालिकेला घेता आली नव्हती.
सदर क्षेत्र नवी मुंबई पालिकेच्या अधिकार कक्षेत असल्याने या विभागातील बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार नवी मुंबई महापालिकेकडे आहेत याबाबत योग्य ते आदेश सिडकोला द्यावेत असे पत्र 30 सप्टेंबर 2025 रोजी पालिकेने शासनाला दिले होते. दरम्यान, पॉकेट डी आणि ई हे क्षेत्र सीआरझेड व फ्लेमिंगो अधिवास पाणथळ क्षेत्रात असल्याने येथे बांधकाम परवानगी देवू नये म्हणून पर्यावरणप्रेमींनी केंद्र सरकारकडे याबाबत तकादा लावला आहे. नवी मुंबई महापालिकेच्या विकास आराखड्यात हे क्षेत्र रहिवाशी वापर करण्यासाठी पालिकेने अधिसूचित केले असून त्याबाबत सूचना व हरकती शासनाने नव्याने मागवल्या होत्या. अनेक पर्यावरण प्रेमींनी यावर अनेक हरकती उपस्थित केल्याने नगरविकास प्रधान सचिव यांनी गुप्तपणे धावती भेट या क्षेत्राला जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दिली होती. नगरविकास विभागाने 13 जानेवारी 2026 रोजी सिडकोला दिलेल्या पत्रात त्यांनी सिडकोचे बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार अबाधित ठेवले असून या बांधकाम परवानगी अंतर्गत मिळणारे विकास शुल्क/अधिमुल्य पालिकेला देण्याचे तुघलकी फर्मान काढले आहे. तसेच पॉकेट डी आणि ई हे पाणथळ क्षेत्र विकास आराखड्यात दाखवल्याने यापुढे या भागावर कोणतीही बांधकाम परवानगी न देण्याची सूचना या आदेशात करण्यात आली आहे. सिडकोने दिलेल्या बांधकाम परवानगीमुळे सदर क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बांधकाम उभे राहिल्याने ही बाब विचारात घेऊन सदर बांधकाम फेट अकंप्ली म्हणून सदर परवानगी यापुढे सिडकोने द्याव्यात असे नमुद केले आहे.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रासाठी महापालिकाच नियोजन प्राधिकरण असल्याचे नगरविकास सदर आदेशात मान्य करत असतानाही या प्रकारचे तुघलकी आदेश काढल्याने प्रधान सचिवांच्या निर्णय क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. दरम्यान, सदर गृहप्रकल्प हा अदानी समुह विकसीत करत असल्याने अदानींच्या प्रेमापोटी ही असीम कृपा नगरविकास विभागाने दाखवल्याची चर्चा दबक्या आवाजात आहे. नुकतेच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका झाल्याने लवकरच लोकप्रतिनिधी पालिकेचा कारभार पाहण्यास सुरुवात करतील, त्यामुळे पालिकेच्या अधिकारांवर गंडांतर आणणाऱ्या नगरविकास विभाग व स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये संघर्ष पाहायला मिळेल असे बोलले जाते.
- आयएएस अधिकारी निर्बुद्ध?
नवी मुंबईसारख्या सुनियोजीत शहरात वारेमाप चटईक्षेत्र देऊन शहराची वाट लावणाऱ्या नगरविकास विभागाची लक्तरे मंत्री गणेश नाईक यांनी निवडणुकीच्या काळात वेशीवर टांगली होती. विकासकांचे भले करण्यासाठी युडीसीपीआर सारखा राक्षसी कायदा मंजुर करणारे आयएएस अधिकारी निर्बुद्ध आहेत का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. ही बाब त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नजरेस आणून दिली असून लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा नवी मुंबईकरांना आहे. - प्रशासकीय काळात नियोजनाचे वाटोळे
नवी मुंबईतील लोकप्रतिनिधींनी वाढत्या लोकसंख्येचा आढावा घेऊन अनेक आरक्षणे विकास आराखड्यात प्रस्तावित केली होती. परंतु, सिडकोचे पदसिद्ध संचालक असलेले नगरविकास प्रधान सचिव यांनी सिडकोचे नुकसान होईल म्हणून ही आरक्षणे काढण्याचे आदेश पालिका आयुक्तांना दिले. पालिका आयुक्तांचे प्रधान सचिवांपुढे काहीही चालत नसल्याने त्यांनी नवी मुंबईकरांचे सार्वजनिक हित जपण्याऐवजी सिडकोचे व आपले हित जपल्याने नवी मुंबईकरांना भविष्यात मोठ्या प्रमाणावर सामाजिक सेवा व सुविधा भुखंडांची कमतरता जाणवणार आहे. यावेळी लोकप्रतिनिधी असते तर चित्र वेगळे असते असे बोलले जाते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे