निर्यातगृहाची दुरवस्था

नवी मुंबई : आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या वाशीतील एपीएमसीमधून परदेशातही भाजीपाल्याची निर्यात होते. परदेशातील निकषानुसार ही निर्यात करताना हायजेनिक पॅक हाउसमधून पाठवणे गरजेचे आहे. यासाठी स्वतंत्र पॅकेजिंग हाउस नसल्याने भाजीपाला बाजारातील सरकारच्या निर्यातगृहात हे पॅकेजिंग सुरू आहे; परंतु या निर्यातगृहाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून कचर्‍याचे आणि घाणीचे साम्राज्य येथे पसरले आहे. सरकारने या निर्यातगृहाची व्यवस्था सुधारावी, अशी मागणी निर्यातदार करत आहेत.

भाजी बाजारातील हे निर्यातगृह 1986 च्या दरम्यान उभारले गेले आहे. तळमजला आणि तीन मजले अशी या निर्यातगृहाच्या इमारतीची रचना आहे. महाराष्ट्र स्टेट अ‍ॅग्रिकल्चरल मार्केटिंग बोर्ड आणि मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या अंतर्गत ही इमारत येते. अनेक जुने निर्यातदार येथे आपल्या मालाचे पॅकिंग करून तो निर्यातीसाठी पाठवून देतात. ही इमारत अगदी जीर्ण झाली असून तिची दुरवस्था आहे. शिवाय, येथे स्वच्छतेचा अभाव आहे. इमारतीची दररोज स्वच्छताही होत नाही. त्यामुळे पेंढा, पेपर, कागद यांचा कचरा इमारतीमध्ये पसरलेला पाहायला मिळतो. शिवाय इमारतीमध्ये चढताना पायर्‍यांवर कचर्‍याचे ढीग पाहायला मिळतात. याचबरोबर येथील शौचालयांची दुरवस्था झाली आहे. इमारतीच्या कचर्‍याचे लोट स्वच्छतागृहात पाहायला मिळतात. अनेक महिन्यांपासून त्यांची स्वच्छताच झालेली नाही. त्यामुळे दुर्गंधी इमारतीभर पसरलेली आहे. निर्यातदारांबरोबर कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

काही वर्षांपूर्वी या इमारतीच्या दुरुस्तीसाठी विपणन संचालकांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र, तो नामंजूर झाला. त्यानंतर बाजार समितीने पुन्हा प्रस्ताव तयार करून मंजूर करून घेतला. त्यानुसार 50 टक्के निर्यातदारांनी आणि 50 टक्के बाजार समिती यानुसार खर्च उचलून या इमारतीचे काम करण्याचे ठरले होते. मात्र, बाजार समितीला कर भरत असताना इमारत बांधणीचा खर्च आम्ही का उचलावा, असा प्रश्न काही निर्यातदारांनी उपस्थित केला. त्यामुळे इमारतीच्या बांधणीचा विषय मागे राहिला. त्यानंतर बाजार समितीने तात्पुरती डागडुजी करून घेतली. मात्र, निर्यातगृहाची दुरवस्था सुरूच आहे.