Breaking News
ठाणे : सह्याद्रीचे अभेद्य कवच असल्यामुळेच इथल्या पर्यावरणाची जपणूक झाली व निसर्गसंपन्नता वाढली. सह्याद्रीच्या डोंगरद-यांनी छत्रपती शिवरायांना स्वराज्य निर्मितीचे स्वप्न साकारण्यात बहुमोल योगदान दिले. अशा सह्याद्रीचे विलक्षण आकर्षण माझ्यासह प्रत्येकाला वाटते. त्यामुळे इतिहास संशोधक सदाशिव टेटविलकर यांनी आपल्या 4 मित्रांसह 40 वर्षांपूर्वी केलेली सह्याद्री पदभ्रमणाची पुस्तकरूपात प्रकाशित होत असलेली मोहीम सह्याद्रीच्या अंतरंगाची अधिक माहिती करून देणारी व त्याच्याविषयीची ओढ अधिकच वाढविणारी असल्याचे मत उद्योजक रविंद्र प्रभुदेसाई यांनी व्यक्त केले.
ठाणे येथील शिवसमर्थ विद्यालयाच्या सभागृहात संपन्न झालेल्या इतिहास संशोधक सदाशिव टेटविलकर लिखित व श्रीकृपा प्रकाशन प्रकाशित ‘सह्याद्री परिक्रमा' या पुस्तक प्रकाशन समारंभाप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना रविंद्र प्रभुदेसाई बोलत होते. याप्रसंगी शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त गिर्यारोहक प्रदीप केळकर, ज्येष्ठ संपादक मिलींद बल्लाळ, आनंद विश्व गुरूकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विलास ठुसे आदी मान्यवर उपस्थित होते.
लेखणीतील सातत्य हे टेटविलकरांचे वैशिष्ट्य असून त्यांची 13 पुस्तके इतिहासाच्या अनेक दुर्लक्षित घटकांकडे बघण्याची वेगळी दृष्टी देतात असे सांगत रविंद्र प्रभुदेसाई यांनी विविध उत्पादनांतून पितांबरी उद्योगसमुह कार्यरत असताना त्यात सेवाभावी दृष्टीकोन जपण्यामुळे समाजाचे ऋणमुक्त होण्याचे समाधान लाभते असे मत मांडले.
विक्रमवीर गिर्यारोहक प्रदीप केळकर यांनी सामान्य कुटुंबातून येऊन असामान्य कर्तृत्व गाजविणारे सदाशिव टेटविलकरांचे व्यक्तिमत्व आम्हां दुर्गप्रेमींसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत सह्याद्रीची परिक्रमा हे त्यांचे पुस्तक भटक्यांचा मार्गदर्शक ठरेल असे मत व्यक्त केले. सह्याद्रीने आम्हाला माणुसकी शिकवली असे सांगून त्यांनी आपण निसर्ग वाचवायला शिकले पाहीजे हे अनेक उदाहरणांसह स्पष्ट केले. ज्येष्ठ संपादक मिलींद बल्लाळ यांनी साध्यासोप्या शैलीत इतिहास मांडणा-या टेटविलकरांच्या लेखनशैलीचे कौतुक करीत स्थानिक इतिहास जपण्यासाठी डॉ. दाऊद दळवी, सदाशिव टेटविलकर अशा व्यक्तींनी केलेल्या ठोस स्वरूपाच्या कामाबद्दल गौरवोद्गार काढले.
लेखक सदाशिव टेटविलकर यांनी आपल्या मनोगतात 1983 मध्ये 4 मित्रांसह केलेल्या सह्याद्री परिक्रमेच्या आठवणी सांगताना दुर्गप्रेमी गो.नी.दांडेकर यांचे आशीर्वाद आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा प्रोत्साहक वरदहस्त याचा विशेष उल्लेख केला. 40 वर्षांपूर्वी प्रवासाची वा संपर्काची फारशी साधने उपलब्ध नव्हती त्यावेळी परिक्रमा करताना द-या, खो-या, जंगल, डोंगरवाटा पार करताना आलेल्या अडचणी व त्यावर केलेली मात याच्या चित्तथरारक आठवणी त्यांनी सांगितल्या. सह्याद्रीच्या द-याखो-यातील माणसांनी ‘अतिथी देवो भव' म्हणत केलेल्या सहकार्याचा त्यांनी कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला.
सीमा टेटविलकर कोंडे यांनी भावना व्यक्त करताना आपल्या वडिलांनी केलेल्या साधेपणाच्या संस्कारांचा आवर्जून उल्लेख करीत त्यामुळे जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन आपसुक तयार झाला आणि कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची जडणघडण होत गेली असे सांगितले. लहानपणापासून वडिलांनी फिरायला नेले ते किल्ल्यांवरच हे सांगताना त्यांनी सह्याद्री भ्रमणासाठी मित्रांसह बाहेर पडलेल्या वडिलांनी तिथून पाठवलेल्या खुशालीचे पत्र आल्यानंतर आईला झालेल्या आनंदाचे वर्णन केले.
महेंद्र कोंडे यांनी ओघवते सूत्रसंचालन केलेल्या या पुस्तक प्रकाशन समारंभप्रसंगी लेखक सदाशिव टेटविलकरांसोबत सह्याद्री परिक्रमेत सहभागी झालेले त्यांचे मित्र सुभाष मांडले तसेच पुस्तक निर्मितीत सहकार्य करणारे पद्माकर शिरवाडकर व सरिता जाधव यांचा विशेष सत्कार करण्यात आला .याप्रसंगी कोकण इतिहास परिषदेच्या सचिव विद्या प्रभू व पदाधिकारी भारती जोशी तसेच रसिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai