 
                                    		
                            राज ठाकरेंना बीडमध्ये विरोध
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 10, 2024
- 449
ताफ्यावर आंदोलनकर्त्यांनी भिरकावल्या सुपाऱ्या 
बीड : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राज्यातील मतदारांचा कौल चाचपण्यासाठी राज ठाकरे यांनी राज्याचा दौरा सुरु केला आहे. शुक्रवारी मराठवाड्यातील बीडमध्ये त्यांचा समायोजित कार्यक्रमासाठी ते आले असता त्यांचा ताफा अडवण्यात आला. ताफ्यावर आंदोलनकर्त्यांनी सुपाऱ्या फेकल्या. दरम्यान, या आंदोलनावर सुरुवात तुम्ही केली शेवट आम्ही करु अशी प्रतिक्रिया राज यांनी दिली.
लवकरच राज्याच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. दरम्यान, सर्वच पक्षांनी चाचपणी करण्यासाठी राज्यात दौरे सुरु केले आहेत. कालच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दौरा सुरु केला असून शरद पवार यांनी राज्यभर आढावा बैठका सुरु केल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर तीन दिवस दिल्लीचा दौरा आटपुन लागोलाग राज्याचाही दौरा सुरु केला आहे. शनिवारी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गडातच कार्यकर्त्यांचा मेळावा लावला आहे. राज ठाकरे हे प्रथमच गांर्भियाने निवडणुक लढवण्याच्या उद्देशाने कृष्णकुंज बाहेर पडले असून त्यांनीही राज्यात 280 उमेदवार उभे करण्याचे जाहीर केले आहे.
या दौऱ्याच्या पार्श्वभुमीवर कार्यकर्त्यांंशी संवाद साधण्यासाठी राज ठाकरे हे मराठबाड्यातील बीड शहरात आले होते. तेथे त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे. यावेळी आंदोलनकर्त्यांनी ठाकरे यांच्या गाडीवर आणि मार्गावर सुपाऱ्या फेकल्या. राज ठाकरेंनी मराठा आरक्षणाबाबत चुकीची भूमिका घेतली, आरक्षणाविरोधात बोलले असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे होते. मात्र केवळ राजकीय विरोधातून हा प्रयत्न झाला आहे. याचा आणि मराठा आरक्षणाचा काही संबंध नाही असा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे. मनसे शहराध्यक्ष करण लोंढे आणि शैलेश जाधव या दोघांनी आंदोलकांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला होता. विशेष म्हणजे काही काळ मनसैनिक आणि शिवसैनिकांमध्ये राडा झाला यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष गणेश वरेकर यांचे शर्ट सुद्धा फाटले आहे. एकीकडे हा विरोध असताना मनसेच्या कार्यकर्त्यांकडून मात्र राज ठाकरेंचं जंगी स्वागत होतंय. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक व्हिडीओ शेअर करत ताफा अडवणाऱ्यांना सक्त ताकीद दिली आहे. संदीप देशपांडे म्हणाले, उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सगळ्या महाराष्ट्र सैनिकांकडून सांगत आहे, सुरूवात तुम्ही केली आता शेवट आम्ही करणार आहे.
- सुपाऱ्याच का?
 राज्यात पहिल्यांदाच आंदोलनकर्त्यांनी एखाद्या पक्षाच्या नेत्यावर सुपाऱ्या फेकल्याचे पाहायला मिळाले आहे. आंदोलनकर्त्यांनी सुपाऱ्याच का फेकल्या? असा प्रश्न जनतेला पडला असताना राज ठाकरे सुपारीबाज आहेत असं म्हणत उबाठाच्या कार्यकर्त्यांनी प्रसारमाध्यमांवर प्रतिक्रिया दिली आहे. यापुर्वी अनेक भाषणात राज ठाकरेंवर उठ दुपारी घे सुपारी अशीही टिका अनेक नेत्यांनी केली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
                                    
                            Stock Market by TradingView
                                
                             
                                 
                                     
                                                                     
                                                                     
                                                                     
                                             
                                             
                                                     
                                                     
                                                     
                                                    
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai