Breaking News
सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा-2024
नवी मुंबइ : पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दिनांक 7 सप्टेंबर 2024 पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी शासनाकडून सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी 5 लक्ष रुपयांचे पहिले पारितोषिक देण्यात येणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी. पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या ईमेलवर दि.31 ऑगस्ट 2024 पूर्वी ऑनलाईन अर्ज करावेत, अशी माहिती पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे संचालक यांनी दिली आहे.
लोकमान्य टिळकांनी जनजागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव आयोजित करण्याची प्रथा सुरु केली. महाराष्ट्र शासनातर्फे सार्वजनिक गणेशोत्सवात जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभागी व्हावे, याकरिता सन 2023 मध्ये राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्यात आले होते. त्याच धर्तीवर दि. 07 सप्टेंबर 2024 पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय शासनाने दि. 31 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार घेतला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा 2024 अंतर्गत मुंबई, मुंबई (उपनगर), पुणे, ठाणे या जिल्ह्यांतून प्रत्येकी तीन व अन्य जिल्ह्यांतून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण 44 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यात येणार असून, त्यातून राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्स मंडळास रुपये 5 लक्ष, द्वितीय क्रमांक रुपये 2 लक्ष 50 हजार व तृतीय क्रमांक रुपये 1 लक्ष इतक्या रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तर उर्वरित 41 जिल्हास्तरीय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 25 हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
सदर स्पर्धेत धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांना सहभागी होता येईल. महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरील पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या दिनांक 31 जुलै 2024 च्या शासन निर्णयाच्या सोबत स्पर्धा निवडीचे निकष आणि अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.दि. 01 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2024 या कालावधीत अर्ज सादर करावा. सदर स्पर्धेत जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai