
बंपर मतदानाने कोणाचे एक्झिट?
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 22, 2024
- 390
30वर्षानंतर विक्रमी मतदान; राज्यात सत्त्तापरिवर्तनाचे संकेत
एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने असले तरी जनतेने कोणाचे एक्झिट केले ते उलगडणार
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठीच्या 288 मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली असून 65 टक्के एवढे विक्रमीमतदान झाले आहे. 23 नोव्हेंबरला जाहीर होणाऱ्या निकालांची प्रतिक्षा जनतेला असून राज्यात एक्झिट पोलचे वारे मात्र मतदानाच्या संध्याकाळपासूनच वाहू लागले आहेत. भाजपप्रणीत महायुतीला पुन्हा सत्ता मिळण्याचे संकेत हे एक्झिट पोल सांगत असले तरी काही संस्थांनी महाविकास आघाडीला बहुमताचा आकडा मिळेल असे सूचवले आहे. एक्झिट पोल काहीही म्हणोत पण जनतेने केलेल्या बंपर मतदानामुळे सगळ्याचीच पोलखोल होणार असून जनतेने कोणाला एक्झिट केले याची उत्कंठा महाराष्ट्राला लागली आहे.
गेल्या 30 वर्षात राज्यात सरासरी 47 ते 50 टक्के दरम्यान मतदान होत होते. परंतु, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या बंपर मतदानाने सर्वच राजकीय पक्षांची झोप उडवली आहे. विधानसभेसाठी राज्यामध्ये सरासरी 65 टक्के मतदान झालेआहे. सर्वच राजकीय पक्ष आम्हालाच बहुमत मिळेल असे जरी सांगत असले तरी बहुमताची शाश्वती सध्या कोणत्याच पक्षाकडे नसून प्रत्येक पक्षप्रमुख आपल्या कार्यकर्त्यांना सत्ता मिळणार असे सांगून धीर देत आहेत. मात्र, मतदानाच्या संध्याकाळपासूनच राज्यातील विविध संस्थांचा एक्झिट पोल प्रसारमाध्यमांनी जाहीर केला असून त्यामध्ये 10 संस्थांचा सरासरी अंदाज पाहता महायुतीला 139 ते 156 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर, महाविकास आघाडीला 119 ते 136 जागांवर यश मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चाणक्य स्ट्रॅटेजी, पोल डायरी, इलेक्ट्रोल एज, मॅट्रीझ, रिपब्लिक, न्यूज 24 पी-मार्क, एसएएस ग्रुप हैदराबाद, दैनिक भास्कर, लोकशाही आणि झी या 10 संस्थांच्या एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. त्यामध्ये, 10 पैकी 7 संस्थांनी भाजप महायुतीला स्पष्ट बहुमत दर्शवले आहे. तर, 3 संस्थांनी महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमताचा अंदाज वर्तवला आहे. मात्र, या 10 संस्थांचा सरकारी एक्झिट पोल पाहिल्यास महायुतीला 139 ते 156 जागांवर विजय मिळू शकतो. तर, महाविकास आघाडीला 119 ते 136 जागांवर यश मिळण्याचा अंदाज आहे. तर, इतर व अपक्ष मिळून कमीत कमी 2 ते जास्तीत जास्त 29 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे, राज्यातील निवडणूक निकालानंतर अपक्ष व इतर पक्षातील विजयी उमेदवारांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. त्यामुळे, सर्वांचीच उत्कंठा ताणली असून 23 नोव्हेंबर रोजी अंतिम निकाल येईल.
विविध संस्थांनी जाहीर केलेले एक्झिट पोल हे मागील काही वर्षांचे सरासरी मतदान व त्यांनी केलेली मतदारांची चाचणी यावर केलेले असतात. परंतु, यावेळी राज्यातील मतदारांनी केलेल्या बंपर मतदानामुळे या संस्थांचे मतदानाचे मुळ अंदाज खोटे ठरल्याने एक्झिट पोल यावेळी खरे उतरतील की नाही याबाबत शंका असल्याची प्रतिक्रिया अनेक जाणकारांनी दिली आहे. त्यामुळे 30 वर्षानंतर झालेले विक्रमी मतदान कोणाच्या पारड्यात आपला कौल टाकते याकडे सर्वांचेच लक्ष लागलेआहे. यावेळी बंपर मतदानामुळे एक्झिट पोलचीच एक्झिट होण्याची शंका व्यक्त केली जात आहे.
- 30 वर्षांचा मतदानाचा विक्रम मोडीत
विधानसभा निवडणुकीत मतदारांनी 30 वर्षांचा मतदानाचा विक्रम मोडीत काढताना भरभरून मतदान केलं आहे. यापूव 1995 मध्ये राज्यात विक्रमी 71.69 टक्के मतदान झाले होते. तेव्हा महाराष्ट्रात पहिल्यांदाच बिगर-काँग्रेस शिवसेना-भाजप युतीचे सरकार स्थापन झाले होते. 2024 च्या सर्वात लक्षवेधी आणि राजकारणाची खिचडी झाली असतानाच 65.1 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीकडून जो जोरदार प्रचार करण्यात आला त्याचा परिणाम मतदानावरही दिसून आल्याचे मानले जात आहे. मात्र, यावेळी कोणाचे सरकार येणारयाकडे सर्वांचे लक्ष आहे.
- वाढलेले मतदान कोणाच्या पथ्यावर
राज्यात झालेल्या विक्रमी मतदानामुळे एक्झिट पोलने जरी महायुतीला सत्ता मिळणार असल्याचे संकेत दिले असले तरी वाढलेला मतदानाचा टक्का हा सत्तापरिवर्तनाचा असतो असे मानले जाते. सुमारे 15 टक्क्यांनी मतदान वाढले असून हे वाढलेले मतदान महायुतीच्या किंवा महाविकासाच्या बाजुने जाते यावर सत्तापरिवर्तन अवलंबून आहे. लोकसभा निवडणुकीत मतदान कमी होऊनही महाविकास आघाडीचे भरघोस उमेदवार निवडून आले होते. जर लोकसभेचा निकष लावल्यास झालेले मतदान हे सत्तापरिवर्तनाचे संकेत देत आहेत असे राजकीय जाणकारांचे मत आहे. - लाडक्या बहिणी कोणाचा करणार गेम
महायुतीने निवडणुकीच्या तोंडावर मध्यप्रदेशात यशस्वी झालेले लाडली बहन योजना महाराष्ट्रात राबवली. निवडणुकीपुव चार हफ्ते बहिनीच्या खात्यात जातील याची दक्षता शिंदे-पवार-फडणवीस या भावांनी घेतली होती. निवडणुक प्रचारातही हे तीनही भाऊ बहिणींना भविष्यात अधिक रक्कम देण्याचे आश्वासन देत होते. यास प्रत्युत्तर म्हणून उद्धव-पवार-पटोले यांनी बहिणींना 3000 हजार देवू असे आश्वासन दिले. दिड हजार दिले असले तरी वाढलेल्या महागाईने त्यांचे महिन्याचे बजेट कोलमडल्याने त्या सत्ताधाऱ्यांना दुषण देत आहेत. त्यामुळे निवडणुकीत महिलांच्या मतदानाचा वाढलेला टक्का हा गेम चेंजर ठरणार असून या लाडक्या बहिणी कोणत्या भावाचा गेम करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. - बळीराजाची नाराजी भोवणार?
सध्या सोयाबीनला 3 हजार 900 ते 4 हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे, तर मध्यम धाग्याचा कापूस 6 हजार 900 रुपयांपर्यंत विकला जात आहे. केंद्र सरकारने दिलेल्या हमी-भावापेक्षा कमी दराने माल विकावा लागल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. एफएक्यू दर्जा, ओलाव्याचे प्रमाण 12 टक्क्यांपेक्षा कमी हे निकष असल्याने बहुतेक शेतकऱ्यांना खरेदी केंद्रांवरून माघारी फिरावे लागले. सरकारने सावरण्याचा प्रयत्न केला तरी शेतकऱ्यांनी आपली नाराजी मतदानपेटीतून व्यक्त केल्याचे बोलले जात आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai