रस्सीखेच की सत्ता पेच
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 29, 2024
- 480
महत्वाच्या खात्यांसाठी तीनही पक्ष आग्रही ; गृहमंत्री आणि नगरविकास खात्यांसाठी शपथविधी लांबला
मुंबई ः महाराष्ट्र विधानसभेचा निकाल जाहीर होवून आठवडा उलटला तरी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. अजित पवार व शिंदे यांनी भाजपचा मुख्यमंत्री बनण्यास समंती दिली आहे. परंतु, शिंदे यांनी आपण मुख्यमंत्रीपद सांभाळल्याने यापुढे त्याखाली काम करणार नसल्याचे शाह यांना सांगितल्याने पुन्हा पेच निर्माण झाला आहे. परंतु अजित दादांसह एकनाथ शिंदे यांची उपमुख्यमंत्रीपदासाठी चर्चा रंगली असली तरी भाजप धक्कातंत्राव्दारे नविन नाव मुख्यमंत्रीपदासाठी सुचविण्याच्या चर्चेने जोर धरला आहे.
राज्यात महायुतीने न भुतो न भविष्यती असा अनपेक्षित विजय मिळवला आहे. निवडणुकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी महायुतीची धुरा सांभाळली होती. त्यांनी आणलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना राज्यात कमालीची यशस्वी ठरली असून शिंदे यांच्या झोळीत भरभरुन मतांचे दान लाडक्या बहिनींनी टाकले आहे. परंतु, यावेळी भाजपलाही या योजनेचा प्रचंड लाभ झाल्याने त्यांना 131 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. 23 नोव्हेंबरला राज्याचा कौल हाती आला असून आतापर्यंत राज्यात सरकार स्थापन होणे अपेक्षित होते. परंतु, अजूनही राज्याचा मुख्यमंत्री जाहीर न झाल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे.
दरम्यान, अजित पवार यांनी भाजपला मुख्यमंत्री पदासाठी समर्थन जाहीर करुन शिंदे यांच्यावर राजकीय कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. शिंदे यांनीही बुधवारी पत्रकार परिषद घेऊन भाजप जो काही निर्णय घेईल त्याला समर्थन देण्याची घोषणा केली. त्यामुळे आता भाजपचा मुख्यमंत्री होईल असे असताना अजुनही भाजपकडून कोणतीच घोषणा न झाल्याने सारेच काही आलबेल नसल्याचे बोलले जात आहे. शिंदे यांनी आपण मुख्यमंत्री होणार नसल्यास आपण मंत्रिमंडळात सामील होणार नसल्याचे दिल्ली भेटीत अमित शाह यांना कळवल्याने भाजपची चिंता वाढली आहे. भाजपही ताक फूंकून पीत असून अजूनपर्यंत त्यांनी फडणवीस यांना हिरवा कंदिल दाखवला नाही. निवडणूकीत मराठा चेहरा मुख्यमंत्री असल्याने त्याचा फायदा झाल्याने राज्याचा मुख्यमंत्री मराठा करावा अशी मागणी भाजप नेत्यांकडूनही होत आहे. फडणवीस यांच्याबद्दल प्रचंड नाराजी राज्यात असल्याने नेहमीप्रमाणे भाजप धक्कातंत्राव्दारे राज्यात नवा चेहरा देण्याची चर्चा राजकीय वर्तूळात होऊ लागली आहे. भाजपने बिहारच्या धतवर अजित पवारांसोबत एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याचे सुत्रांकडून कळत आहे. याला मुख्यमंत्री शिंदे कसा प्रतिसाद देतात याकडे भाजपचे लक्ष लागले आहे. दरम्यान शिंदे यांनी आपला मुक्काम गावी हलविल्याने राजकीय वर्तूळात चर्चांना उधाण आले आहे.
- एकनाथ शिंदेकडे सात खासदारांचा हूकमी एक्का
दिल्लीतील मोदींचे सरकार चंद्राबाबू नायडू व नितिशकुमार यांच्या टेकूवर उभे आहे. त्यातच चिराग पासवास गटात राजकीय अस्वस्थता असल्याने शाह अशा परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. त्यातच एकनाथ शिंदे यांच्याकडे सात खासदारांचा हूकमी एक्का असल्याने भाजप महाराष्ट्राबाबत निर्णय घेण्यास कचरत आहे. हि बाब शिंदे जाणून असल्याने त्यांनी भाजपच्या चाणक्यांना जेरीस आणले आहे. - देवेंद्र फडणवीस भाजपा अध्यक्ष?
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे उर्ध्वयु देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल प्रचंड नाराजी महाराष्ट्रात असल्याने त्यांच्याऐवजी मध्यम मार्ग काढणारा मुख्यमंत्री राज्याला द्यावा अशी धारणा भाजपा नेतृत्वाची असल्याचे बोलले जाते. त्यामुळे राज्यात एखादा मराठा चेहरा मुख्यमंत्रीपदी बसवून फडणवीस यांना नड्डा यांच्या जागी राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्याची चर्चा सध्या जोरात असून दिल्लीत त्यांच्यासाठी बंगलाही आरक्षित केल्याचे बोलले जाते.
- महायुतीची बैठक अचानक रद्द
सत्तास्थापना आणि मुख्यमंत्रिपदासंदर्भात गुरुवारी रात्री दिल्लीत अमित शाह यांच्या बैठकीनंतर मुंबईत पुन्हा शुक्रवारी महायुतीची बैठक होणार होती. मात्र काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी त्यांच्या मूळगाव देरे सातारा येथे गेल्याने महायुतीची ही बैठक रद्द करण्यात आली आहे. - मोक्याच्या खात्यांवर दावे
महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा पेच सुटला असला तरी महत्त्वाच्या खात्यांवरून तिन्ही प्रमुख पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. प्रामुख्याने वित्त, गृह, ऊर्जा, जलसंपदा अशा काही महत्त्वाच्या खात्यांसाठी भाजप, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) आग्रही आहेत. मुख्यमंत्रीपदाबरोबरच महत्त्वाची खातीही आपल्याकडेच ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न असला, तरी शिंदे आणि अजित पवार यांना चांगल्या खात्यांची अपेक्षा आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai