सुलेखनकार अच्युत पालव यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 29, 2025
- 219
नवी मुंबई ः भारत सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर केलेल्या पद्म पुरस्कारांमध्ये जगप्रसिध्द सुलेखनकार अच्युत पालव यांना ‘पद्मश्री’ हा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्त नवी मुंबई पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ.कैलास शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन अभिनंदन करीत यथोचित सन्मान केला.
सुलेखनकार अच्युत पालव यांना अत्यंत मानाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर होणे ही नवी मुंबई शहराचा नावलौकिक वाढविणारी गोष्ट असून प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकाला अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे अशी भावना व्यक्त करीत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी नवी मुंबईच्या शहर सुशोभिकरणात अच्युत पालव यांनी दिलेल्या मौलिक योगदानाचा विशेष उल्लेख केला. स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत नवी मुंबई महापालिकेने राबविलेली चित्रकविताभिंतींची अभिनव संकल्पना अच्युत पालव यांच्या कविता सुलेखनातून यशस्वी झाली होती. त्याचे कौतुक राज्यभरातून झाले. विशेष म्हणजे याची दखल राष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आली. मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून आपल्या सुलेखनातील विद्यार्थ्यांसह ते मागील अनेक वर्ष वाशीच्या छ्त्रपती शिवाजी महाराज चौकातील प्रदर्शनी भागात मराठी सुलेखनाचे प्रदर्शन पालिकेच्या सहयोगाने आयोजित करीत असतात. स्वच्छ नवी मुंबई मिशनचे ते नवी मुंबई पालिकेचे ब्युटिफिकेशन आयकॉन आहेत.
चाळीसहून अधिक वर्षे समर्पित भावनेने सुलेखनासाठी व त्यातही मोठी लिपीसाठी अनमोल योगदान देणाऱ्या अच्युत पालव यांच्यासारख्या व्यक्तीमत्वाचा पद्मश्री पुरस्काराने यथोचित गौरव होताना आपण नवी मुंबईचे नागरिक आहोत याचा अभिमान असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. एखादी गोष्ट निष्ठापूर्वक करीत राहिलो तर त्यात यश निश्चितपणे मिळते असे स्वानुभवातून मत व्यक्त करीत अच्युत पालव यांनी पद्मश्री पुरस्कारामुळे सुलेखन क्षेत्रात येणाऱ्या नव्या पिढीला प्रोत्साहन मिळेल, नवी दिशा मिळेल असे सांगितले. भारत हा लिपीप्रधान देश असून विविध लिप्यांमध्ये काम करण्यासारखे भरपूर आहे, त्यातली मिठास पकडली पाहिजे, मग लिप्यांचा वापरातून माणसे जोडली जातील असे ते म्हणाले.
- लिपी जिवंत ठेवणे आवश्यक
अक्षरलिपी या सभ्यता व संस्कृतीच्या वाहक असतात. भारतीय संस्कृती प्राचीन असून संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या लिपीचे जतन करणे गरजेचे आहे. अन्यथा आपला इतिहास विसरला जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सुलेखनकार अच्युत पालव लिखित ‘अक्षरभारती’ या कॅलिग्राफी पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जहांगीर आर्ट गॅलरी येथे झाले. मुख्यमंत्र्यांनी पालव यांचे पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai