वाघांचे मृत्यू रोखण्यासाठी कडक उपाययोजना करा
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 29, 2025
- 309
वनमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश ; वाघांची संख्या वाढली; एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 30 टक्के पर्यंत वनक्षेत्र वाढविणार
मुंबई : राज्यात वाघांचे होणारे मृत्यू शासनाने गांभीर्याने घेतले असून वन अधिकाऱ्यांना अपघाती मृत्यू रोखण्याचे निर्देश दिल्याची माहिती वन मंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे. त्याचबरोबर मागील सोळा वर्षात राज्यामध्ये वाघांची संख्या सरासरी 350 ने वाढली असल्याचे ते म्हणाले. केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे राज्यातील वनक्षेत्र एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 30 टक्के पर्यंत वाढविण्याचा प्रयत्न असणार आहे, असेही नाईक यांनी सांगितले.
30 डिसेंबर 2024 ते 22 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये राज्यात विविध घटनांमध्ये बारा वाघांचा मृत्यू झाला. पाच वाघांचा मृत्यू आपापसातील संघर्षातून जखमी झाल्याने, आजारपणामुळे इत्यादी नैसर्गिक कारणांनी झालेला आहे. चार वाघांचा मृत्यू अन्य जनावरांसाठी लावण्यात आलेल्या विजेच्या तारांचा शॉक लागल्याने झाला आहे. किंवा वाहनांच्या धडकेने झाला आहे. तीन प्रकरणांमध्ये वाघांचा मृत्यू हा शिकारीने झाल्याचे समोर आले आहे. या तीनही प्रकरणांमध्ये एकूण नऊ आरोपींना वन विभागाने अटक केली आहे.
- राज्यात वाघांच्या संख्येत वाढ
राज्यात 2006 मध्ये 103 वाघांची संख्या होती. 2010 मध्ये ही संख्या वाढून 169 झाली. 2014 मध्ये यामध्ये आणखी वाढ होऊन वाघांची संख्या 190 वर पोहोचली. 2018 मध्ये वाघांची संख्या 312 होती. तर 2022 मध्ये झालेल्या वाघांच्या गणनेमध्ये वाघांची संख्या 444 नोंदली गेली. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार दर चार वर्षांनी वाघांची गणना करण्यात येते. या पुढील गणना 2026 मध्ये होणार आहे, असेही वनमंत्री नाईक यांनी सांगितले. - वन क्षेत्रात वाढीसाठी प्रयत्न करणार
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्याचे वनक्षेत्र किमान 30 टक्के असायला हवे. या अनुषंगाने महाराष्ट्राचे वनक्षेत्र 21 टक्यावरून 30% पर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. जंगलांच्या गाभा क्षेत्रामध्ये रानफळांची रायवळ आंबे, बोर, जांभूळ इत्यादी झाडे लावल्यास शाकाहारी प्राण्यांना त्या ठिकाणीच अन्नाची सोय होईल आणि मांसाहारी प्राण्यांच्या अन्नाची सोय देखील होईल. त्यामुळे भक्षाच्या शोधार्थ वाघ मानवी वस्तीपर्यंत येणार नाहीत, असे वनमंत्री गणेश नाईक म्हणाले. पालघर मधील बहाडोई येथे जांभळाची प्रगत जात उत्पादित केली जाते. वनखात्याच्या नर्सरीमधून जागतिक दर्जाची जांभूळ रोपे तयार करून वन खात्याच्या विविध विभागांमध्ये लावण्याची सूचना देण्यात आल्याचे वन मंत्री गणेश नाईक यांनी यावेळी सांगितले. - खासगी वनीकरणाला प्रोत्साहन
खासगी वनीकरणाला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन श्री. नाईक यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुचित केल्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अद्ययावत नर्सरी उभारण्यात येणार आहे. पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या जिल्ह्यामध्ये लवकरच विविध तालुक्यांमध्ये जनता दरबार आयोजित करण्यात येणार असल्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.
वाघांचे मृत्यू रोखण्यासाठी उपाययोजना
- जिल्हास्तरीय व्याघ्र समितीच्या बैठकीत वाघ, बिबट इतर वन्य प्राण्यांच्या संरक्षणाच्या उपाययोजनांची आखणी करण्यात येत आहे.
- विद्युत प्रवाहाचा धक्का लागून वाघांचे होणारे मृत्यू थांबवण्यासाठी वनविभाग व महावितरण कंपनी मिळून प्रतिबंधात्मक उपाय करण्यात येत आहे.
- अवैध शिकाऱ्यांची माहिती मिळण्याकरिता परिक्षेत्र स्तरावर खबऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
- -व्याघ्र संरक्षण दलातील पथकामार्फत अतिसंवेदनशील क्षेत्रात नियमित गस्त करण्यात येते. तसेच डॉग स्कॉड अंतर्गत सुध्दा गस्ती करून शिकारी हालचालीवर नियंत्रण ठेवण्यात येते.
- M - Stripes प्रणाली असलेल्या मोबाईलचा पुरवठा क्षेत्रिय कर्मचाऱ्यांना करण्यात आला आहे. त्याद्वारे संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यात येते.
- अतिसंवेदनशील क्षेत्रात बिनतारी संदेश यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
- राज्यातील वन्यप्राण्यांबाबत गुन्हे प्रकरणांची अद्यावत माहिती ठेवण्याकरिता वन्यजीव गुन्हे कक्ष प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालय, नागपूर येथे तयार करण्यात आला आहे.
- मेळघाट व्याघ्र प्रकल्पात तयार करण्यात आलेल्या सायबर सेलच्या माध्यमातून शिकारीच्या घटनांमधील आरोपींचा शोध घेण्यात येतो.
- अतिसंवेदशील क्षेत्रात आवश्यक त्या ठिकाणी तपासणी नाके तयार करण्यात आले आहेत.
- परिक्षेत्र स्तरावर वाघ व बिबट या वन्यप्राण्यांचे मागोव्याचा निश्चित कार्यक्रम राबवून त्यांच्या अस्तित्वाबाबतची माहिती घेण्यात येते.
- वाघाचे भ्रमणमार्ग, पाणवठे व महत्वाचे ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावून संशयास्पद हालचालींवर पाळत ठेवण्यात येते. तसेच पाण्यामध्ये विष प्रयोग होऊ नये याकरिता पाणवठ्याची नियमीत तपासणी केली जाते.
- मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने पाणवठ्याकडे जाणाऱ्या मार्गावर शिकारी लोकांद्वारे लोखंडी ट्रॅप लावले नसल्याची खातरजमा करण्यात येणार.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai