Breaking News
संगणक, प्रिंटर खरेदीसाठी 5 कोटी तर प्रचारासाठी 3 कोटींचा निधी
मुंबई : लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर महायुती सरकारने जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. दरमहा 1500 रु. देण्याच्या घोषणेमुळे ही योजना विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीसाठी गेम चेंजर ठरली. या योजनेला बळकटी देण्यासाठी महिला व बालविकास विभागाकडून 8 कोटींचा निधी मंजुर करण्यात आला आहे. यामध्ये संगणक आणि प्रिंटर खरेदीसाठी 5 कोटींपर्यंत खर्च करण्याची मुभा असून जाहिरातींसाठी 3 कोटींचा निधी मंजुर करण्यात आला आहे.
महायुती सरकारने जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू करुन महिला वर्गाची मते पारड्यात पाडून घेतली. राज्यातील पात्र लाभाथ महिलांच्या खात्यात आतापर्यंत सात हप्त्यांची रक्कम जमा झाली आहे. म्हणजेच एका महिलेला 1500 रुपयांप्रमाणे 10500 रुपये मिळाले आहेत. जानेवारी महिन्यात साधारणपणे 2 कोटी 41 लाख महिलांना सातव्या हप्त्याची रक्कम मिळाली आहे. या योजनेच्या कामकाजासाठी संगणक आणि प्रिंटर (स्कॅनरसह) खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून जारी केलेल्या शासन निर्णयानुसार संगणक आणि प्रिंटर खरेदीसाठी 5 कोटींपर्यंत खर्च करण्याची मुभा देण्यात आली आहे. हा शासन निर्णय 5 फेब्रुवारीला जारी करण्यात आला आहे. महिला व बालविकास विभाग मुंबई, आयुक्त महिला व बालविकास, पुणे आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय अशा एकूण 38 कार्यालयांमध्ये 596 संगणक आणि 76 प्रिंटर कम स्कॅनर खरेदीला मान्यता देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या योजनेच्या प्रसिद्धीसाठी माहिती व जनसंपर्क विभागाने तयार केलेल्या सोशल मीडिया आणि डिजीटल मीडिया प्लॅनसाठी 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. दोन्ही मीडियावर प्रत्येकी दीड कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai