Breaking News
मुंबई : राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये विशाखा समिती स्थापन करण्यात आली आहे. खासगी आस्थापनात विशाखा समिती स्थापन करणे बंधनकारक करून विविध स्तरांवर आढावा घेतला जाईल असे महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य चित्रा वाघ यांनी विशाखा समिती संबंधित उपस्थितीत केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना त्या बोलत होत्या. महिला व बालविकास मंत्री तटकरे म्हणाल्या, राज्यातील काही खासगी आस्थापनात विशाखा समिती स्थापन करण्यात आलेल्या नाहीत. या समित्या स्थापन करण्यासाठी विविध स्तरांवर आढावा घेतला जाईल. विशाखा समिती स्थापन करण्यासाठी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची स्वतंत्र समिती स्थापन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. विशाखा समितीत येणाऱ्या तक्रारींचा निपटारा जलद गतीने करण्याची कार्यवाही करण्यात येईल.
राज्य शासनाने महिलांच्या कार्यस्थळी सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलत विविध आस्थापनांमध्ये तक्रार समिती तसेच जिल्हास्तरीय स्थानिक तक्रार समित्या स्थापन करण्याचे आदेश दिले असल्याचे तटकरे यांनी सांगितले. राज्यात सध्या 74,010 समित्या स्थापन झाल्या आहेत. तसेच, 10 पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या ठिकाणी किंवा नियोक्त्याविरोधात तक्रारी असतील, अशा प्रकरणांसाठी जिल्हास्तरावर 36 स्थानिक तक्रार समित्या कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.
महिला व बालविकास आयुक्तालय यांना यासंदर्भात राज्य समन्वय अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. जिल्हास्तरीय, महानगरपालिका, नगरपालिका आणि तालुका पातळीवरही नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. महिलांना ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून देखील तक्रार नोंदविता येईल असे तटकरे म्हणाल्या. राज्य शासन वेळोवेळी बैठकांच्या माध्यमातून आणि परिपत्रकाद्वारे या समित्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पाठपुरावा करत आहे. त्यामुळे महिलांना त्यांच्या कार्यस्थळी सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरण मिळण्यासाठी योग्य पावले उचलली जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai