दहशतवादाला एकमुखी लगाम!
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 25, 2025
- 189
सरकारच्या संभाव्य कारवाईला सर्वपक्षीयांचा पाठिंबा
नवी दिल्ली ः जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी मोठा दहशतवादी हल्ला झाला ज्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्याने जगभरात संतापाची लाट पसरली पसरली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गुरुवारी सर्व पक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीमध्ये दहशतवादी हल्ल््यात जीव गमावणाऱ्या नागरिकांना श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी पहलगाम हल्ल्याला सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी कारणीभूत असल्याची कबुली केंद्र सरकारने दिली. तसेच दहशतवादी आणि त्यांच्या पाठिराख्यांवर सरकारकडून होणाऱ्या कोणत्याही संभाव्य कारवाईला सर्व पक्षांनी एकमुखी पाठिंबा दर्शवून एकात्मतेचा संदेश देशाला दिला आहे.
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप पर्यटकांनी आपला जीव गमावला. या हल्यानंतर जगभरातील नागरिकांच्या संतप्त भावना समोर येत असून दहशतवादाचा मुळापासून नष्ट करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. अशात सतत दहशतवाद्यांना पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानवर भारताने कडक निर्बंध लादले आहेत. याचबरोबर केंद्र सरकारने पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल माहिती देण्यासाठी आणि त्यांचे विचार ऐकण्यासाठी गुरुवारी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती. सिंधु पाणी वाटपाच्या कराराला स्थगिती देण्यात आली आहे, तसेच अटारी बॉर्डर देखील बंद करण्यात आली आहे, सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर गुरुवारी सर्व पक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. पाकिस्ताविरोधात महत्त्वाचे पाच निर्णय घेतल्यानंतर सरकारने या बैठकीचे आयोजन केले होते. सुरक्षा व्यवस्थेकडून कुठल्या ना कुठल्या प्रकारची चूक झाली आहे, म्हणून तर आपण या घटनेबद्दल बोलत आहोत’, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बैठकीत सांगितल्याचा दावा विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केला. पहलगाममध्ये 22 एप्रिलला दहशतवादी हल्ला केला गेला. त्याआधी दोन दिवस म्हणजे 20 एप्रिलपासून बैसरनचे पठार सुरक्षा यंत्रणेच्या परवानगीविना पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. याची माहिती पहेलगामच्या स्थानिक प्रशासनालाही नव्हती. पहेलगामच्या स्थानिक पर्यटन कंपन्यांनी पर्यटकांना घेऊन जाणे सुरू केले. पण, त्याची माहिती सुरक्षा व्यवस्थांना नव्हती. त्यामुळे बैसरन भागात निमलष्कराची वा पोलिसांची सुरक्षा तैनात केली गेली नाही, अशी माहिती बैठकीमध्ये देण्यात आल्याचे आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी सांगितले.
बैसरनमध्ये पर्यटकांचा ओढा लक्षात घेऊन या भागात पोलीस व केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) तैनात केले जाते. मग, यावेळी या यंत्रणा कुठे होत्या, असा प्रश्न लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी उपस्थित केला. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला केंद्रीयगृहमंत्री अमित शहा, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे यांच्यासह बहुतांश सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांचे सदस्य उपस्थित होते. सुरूवातीला गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्यांनी 20 मिनिटे घटनेबाबत तपशिलावर माहिती दिली. त्यानंतर विरोधी पक्षांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले. गरज पडेल तेव्हा शहा मध्यस्थी करून प्रश्नांना उत्तरे देत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. पाकिस्तानची नाकाबंदी करण्याबाबत उचललेल्या पावलांची माहितीही यावेळी देण्यात आली. त्यानंतर देशाच्या हितासाठी केंद्र सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या निर्णयांना सर्व पक्षांचा पाठिंबा असेल असे आश्वासन विरोधी पक्षांनी दिल्याचे तृणमूल काँग्रेसचे खासदार सुदीप बंडोपाध्याय यांनी सांगितले. अमरनाथ यात्रेवेळी बैसरनला पर्यटक जातात. त्यामुळे तेथे जूनपासून सुरक्षाव्यवस्था तैनात असते. पण, एप्रिलपासूनच पर्यटक जाऊ लागले होते. हजारो पर्यटक जात असताना याची माहिती ना पोलिसांना होती ना सैन्य दलांना.
दरम्यान या बैठकीमध्ये बोलताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी या हल्ल्यानंतर सरकारकडून आतापर्यंत काय कारवाई करण्यात आली याची माहिती दिली आहे. ही घटना खूप दुख:दायक आहे, या हल्ल्यामुळे देशात संतापाची लाट आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सरकारकडून अनेक महत्त्वाची पाउलं उचलली जात आहेत, असं रिजिजू यांनी म्हटलं आहे. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती होती.
- महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाईन जारी
राज्य सरकारकडून काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रायीन नागरिकांना परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. विशेष विमानाने या नागरिकांना महाराष्ट्रात आणले जात आहे. त्यासाठी काही हेल्पलाईन्सही सरकारने जारी कोलेल्या आहेत. - ठाकरे गटाच्या पक्षाचे प्रतिनिधी अनुपस्थित
सर्वपक्षीय बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित नव्हते. या बैठकीचे निमंत्रण ठाकरे गटाला देण्यात आले होते. मात्र संसदेतील ठाकरे गटाचे फ्लोअर लिडर अरविंद सावंत यांनी सरकारला एक पत्र लिहून काही अपरिहार्य कारणामुळे या बैठकीला उपस्थित राहू शकत नाही, असे कळवले होते. तसेच अशा कठीण परिस्थितीत आमचा पक्ष सरकारसोबत पूर्ण ताकदीने उभा आहे, असेही ठाकरे गटाने केंद्र सरकारला आश्वस्त केले होते. - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे. “मला या गोष्टीचे फार दु:ख आहे. जेव्हा शत्रू आपल्यावर हल्ला करतो, पहलगामसारखा हल्ला केला जातो, तेव्हा भारतीय पक्षांनी राजकारण केलेलं नाही. दिवंगत नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी बांगलादेश युद्धाच्या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पूर्णपणे पाठिंबा दिला होता. आज मात्र अल्पमतीने भूमिका घेतली जात आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
- सरकारने अधिक गांभीर्याने घ्यायला पाहिजे
शरद पवार म्हणाले की, काश्मीरमध्ये जे झाले त्या प्रश्नाकडे सगळ्या देशवासीयांनी एका विचाराने सरकारसोबत राहिले पाहिजे, इथं राजकारण आणायचं नाही. सरकारने हे अधिक गांभीर्याने घ्यायला पाहिजे. घडलेली घटना बघितल्यानंतर कुठे ना कुठे कमतरता आहे हे स्पष्ट आहे. ही कमतरता सरकारने घालवायला हवी. सरकार कमतरता आहे हे मान्य करत असेल तर त्यांनी तातडीने पावले टाकावीत. काही कामात आम्हा लोकांचं सहकार्य राहील.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai