प्रभाग रचनेचा कार्यक्रम ठरला
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 14, 2025
- 92
मुंबई ः राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम नगरविकास विभागाने गुरुवारी जाहीर केला. त्यानुसार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही प्रभाग रचना पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये निवडणूक होण्याची शक्यता धूसर आहे. ती नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत पुढे जाऊ शकते.
नगरविकास विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 9 टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. राज्य निवडणूक आयुक्तांनी मुंबई महापालिकेची अंतिम केलेली प्रभाग रचना ही 29 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरदरम्यान जाहीर केली जाईल. अ, ब आणि क दर्जाच्या महापालिकांची अंतिम प्रभाग रचना ही 29 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरदरम्यान जाहीर केली जाईल. ड दर्जाच्या महापालिकांची अंतिम प्रभाग रचना 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरदरम्यान जाहीर केली जाईल. नगर परिषदा आणि नगरपंचायतींची अंतिम प्रभाग रचना ही राज्य निवडणूक आयुक्त 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरदरम्यान जाहीर करतील. याचा अर्थ अंतिम प्रभाग रचना ही सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध होईल. त्यानंतर दोन महत्त्वाचे टप्पे असतील. आधी प्रभागांचे आरक्षण जाहीर केले जाईल आणि नंतर प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. हे दोन टप्पे पूर्ण व्हायला किमान एक ते दीड महिना लागतो, असा पूर्वानुभव आहे. हे लक्षात घेता ऑक्टोबरच्या शेवटी वा नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत सर्व कार्यवाही पूर्ण होऊनच निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा लागेल. त्यामुळे महापालिका व नगरपालिकांची निवडणूक नोव्हेंबर वा डिसेंबरपर्यंत पुढे जाण्याची शक्यता आहे.
कार्यक्रमाचे टप्पे
- 11 ते 16 जून- प्रगणक गटांची मांडणी करणे
- 17 ते 18 जून - जनगणनेची माहिती तपासणे
- 19 ते 23 जून - स्थळ पाहणी करणे
- 24 ते 26- गूगल मॅपवर प्रभागाचे नकाशे तयार करणे
- 27 ते 30 जून - नकाशावर निश्चित केलेल्या प्रभाग हदद्दींची प्रत्यक्ष पाहणी करणे
- 1 ते 3 जुलै - प्रभाग समित्यांच्या मसुद्यावर समितीने सह्या करणे
- 4 ते 8 जुलै- प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगास पाठविणे
- 15 ते 21 जुलै- प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे आणि त्यावर हरकती, सूचना मागविणे
- 22 जुलै ते 31 ऑगस्ट- हरकतींवर सुनावणी घेणे
- 1 ते 11 ऑगस्ट - सुनावणीनंतर हरकती व सूचनांवरील शिफारशी विचारात घेऊन प्राधिकृत अधिकाऱ्यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगास मान्यतेसाठी पाठविणे
- 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर- राज्य निवडणूक आयुक्तांनी मान्यता दिलेली रचना संबंधित महापालिका आयुक्त/ मुख्याधिकारी यांना कळविणे आणि राज्य निवडणूक आयुक्तांनी अंतिम केलेली प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करणे
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai