गणेशोत्सवापूर्वी महामार्ग वाहतुकीसाठी सुसज्ज करा
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 08, 2025
- 141
सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची मुंबई-गोवा महामार्गाचा पाहणी दौरावेळी सूचना
पनवेल : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास सुकर आणि सुरक्षित व्हावा, या एकमेव ध्येयाने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी गुरुवारी मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली. पनवेल येथील पळस्पे फाटा येथून रत्नागिरी जिल्ह्यातील हातखांबा पर्यंत दौरा केला. रखडलेल्या कामांवरून त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले आणि कोणत्याही परिस्थितीत गणेशोत्सवापूर्वी महामार्ग वाहतुकीसाठी सुसज्ज करण्याच्या सक्त सूचना दिल्या. या रस्त्याचे काम 90 ते 95 टक्के पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.
मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सकाळी पनवेलमधून दौऱ्याला सुरुवात केली. महामार्गाच्या विविध टप्प्यांवर प्रत्यक्ष थांबून त्यांनी कामांची गुणवत्ता आणि गती तपासली. अनेक ठिकाणी कामे संथ गतीने सुरू असल्याचे पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. स्थानिक अभियंते, ठेकेदार आणि संबंधित विभागीय अधिकाऱ्यांसोबत त्यांनी जागेवरच चर्चा करून कामाच्या वेळापत्रकाचा आढावा घेतला.
महामार्गाचे सुमारे 90 ते 95 टक्के काम पूर्ण झाले असल्याचे सांगताना, कामात प्रगती न दाखविणाऱ्या काही ठिकाणच्या कंत्राटदारांना बदलण्यात आले असून नैसर्गिक अडथळे तसेच महामार्गाच्या भूसंपादनातील तांत्रिक अडचणींमुळे कामांना विलंब झाल्याचे मंत्री भोसले यांनी स्पष्ट केले. विशेषतः माणगाव आणि इंदापूर परिसरातील निविदा प्रक्रिया उशिरा झाल्याने त्या परिसरातील कामांना थोडा वेळ लागणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. परंतू जेथे कंत्राटदार कंपनीमध्ये बदल केले आहेत तेथे सध्या नव्या कंत्राटदार कंपन्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वे उड्डाणपुल, बायपास यांसारखी कामे अंतिम टप्प्यात आली असून उर्वरित अपूर्ण कामे देखील प्राधान्याने मार्गी लावण्यात येत असल्याचे मंत्री भोसले म्हणाले. चिखल या गावाजवळील वाहनांसाठी अंडरपास आणि सेवा रस्त्याची मागणी मान्य करून ती कामे लवकरच पूर्ण करण्यात येतील, असेही त्यांनी आश्वासन दिले. यासाठी सुमारे 200 कोटी रुपयांचा स्वतंत्र प्रस्ताव तयार करून तो केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगीतले.
या दरम्यान, परशुराम घाटातील अपघातांच्या वाढत्या घटनांकडेही मंत्री भोसले यांनी लक्ष वेधले. घाटातील दरड कोसळण्याचे प्रमाण आणि अपघातांमुळे या भागात नवीन वायरडक्टसाठी सर्वेक्षण करून प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आहे. या प्रस्तावालाही लवकरच मंजुरी मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मुंबईहून कोकणाकडे जाण्यासाठी बांधणाऱ्या महामार्गाचे काम गेल्या 12 वर्षांपासून सूरू आहे. यंदाच्या गणेशोत्सवात तरी या महामार्गाचा वापर करुन कोकणवासीय तळकोकणापर्यंत सूखद प्रवास करतील हे अपेक्षित होते. मात्र 95 टक्के काम पूर्ण झालेल्या महामार्गाचे पुढील कामे 21 दिवसात कशी पूर्ण होतील याकडे कोकणात जाणारे चाकरमानी लक्ष्य देऊन आहेत.
मंत्री महोदयांच्या या दौऱ्यामुळे आणि त्यांनी दिलेल्या सक्त सूचनांमुळे आता कामाला वेग येण्याची अपेक्षा आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोकणात लाखो भाविकांची वर्दळ असते. ही बाब लक्षात घेऊन महामार्गावरील कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित ठेकेदार, अधिकारी आणि यंत्रणांनी आता त्यांच्या जबाबदाऱ्या अधिक गांभीर्याने पार पाडाव्यात, अशी स्पष्ट ताकीद मंत्री भोसले यांनी दिली आहे. कामाची गती वाढवताना प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai