Breaking News
मुंबई : राज्यातील बालसंगोपन संस्थांमध्ये राहणाऱ्या समस्याग्रस्त आणि विधी संघर्षीत मुलांना मानसिक आरोग्यसेवा व समुपदेशन करण्यासाठी महिला व बालविकास विभाग एमपॉवर संस्थेच्या माध्यमातून “मासूम“ प्रकल्प राबवित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशील निर्णयामुळे या प्रकल्पाचा आजपर्यंत 3,337 मुलांना लाभ झाला असून एकूण 9593 वैयक्तिक समुपदेशन सत्रे पार पडली आहेत.
महाराष्ट्रातील महिला व बालविकास विभाग राज्यातील बालकल्याण व मानसिक आरोग्याच्या कार्याला बळकटी देण्यासाठी, आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या या उपक्रमामार्फत ‘मासूम’ प्रकल्प राबवीत आहे. या प्रकल्पांतर्गत अडचणीत असलेल्या व विधी संघर्षीत मुलांना, जे बाल संगोपन संस्थांमध्ये राहतात, त्यांना मानसिक आरोग्य सेवा व समुपदेशन पुरवले जाते. हा सार्वजनिक-खाजगी भागीदारीचा उपक्रम, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आला आहे. सेवेची भावना या उद्देशाने व बांधिलकीने व आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या संस्थापिका व अध्यक्षा, नीरजा बिर्ला यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या प्रयत्नातून 180 दशलक्षाहून अधिक लोकांपर्यंत पोहोचून, एमपावर हे दक्षिण आशियातील मानसिक आरोग्य साक्षरता, क्षमता-वृद्धी आणि सामुदायिक संपर्कावर लक्ष केंद्रित करणारे सर्वांत मोठे खासगी व्यासपीठ ठरले आहे.
महिला व बालविकास विभाग सोबतच्या सामंजस्य करारानंतर हा प्रकल्प मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर आणि नाशिक या विभागांमध्ये राबवला जात आहे. एकूण 19 बालसंगोपन संस्थांना पाच मानसशास्त्रज्ञाच्या टीमकडून सेवा दिल्या जात आहेत. या प्रकल्पांतर्गत मानसशास्त्रज्ञ रोटेशन पद्धतीने सीसीआयला भेट देतात, स्तिथीपरत्वे समुपदेशन करतात, मुलांचे मानसिक आरोग्य स्क्रिनिंग करतात आणि गरजेनुसार थेरपी सेवा पुरवतात. याशिवाय गंभीर प्रकरणांमध्ये बालकल्याण समिती आणि किशोर न्याय मंडळाला तज्ज्ञांचे सहकार्य दिले जाते. थेरपिस्ट काही मुलांच्या आरोग्य आणि मानसिक परिस्थितीनुसार त्यांचे तणाव मापन पट्टी, आक्रमकता मापन पट्टी, स्थिती-गुणधर्म चिंतामापन चाचणी, मानसिक आरोग्य व कल्याण मापन पट्टी यांसारख्या साधनांद्वारे सखोल परीक्षण केले जाते. मुलांच्या कुटुंबियांनाही समुपदेशनाची सुविधा दिली जाते. पालकांचे समुपदेशन केल्याने, मुले घरी परतल्यावर त्यांना पुर्वीप्रमाणे मोकळे वातावरण मिळेल हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. मासूम प्रकल्प हा राज्यातील बालसंगोपन संस्थांमध्ये मानसिक आरोग्य सेवांना बळकटी देणारा ठरला असून मुलांच्या पुनर्वसन प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
या प्रकल्पासंदर्भात व आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या संस्थापिका व अध्यक्षा नीरजा बिर्ला म्हणाल्या की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील संस्थांमध्ये राहणाऱ्या मुलांच्या मानसिक आरोग्याला दिलेले प्राधान्य हे दूरदर्शी नेतृत्वाचे द्योतक आहे. या सार्वजनिक-खासगी भागीदारीद्वारे चे कार्य म्हणजे अडचणीत असलेल्या व विधी संघर्षीत मुलांना त्वरित ट्रॉमा रिलिफ व सर्वसमावेशक मानसशास्त्रीय आधार देणे. प्रशिक्षित मानसशास्त्रज्ञांच्या मदतीने विद्यमान प्रणालीला बळकटी देऊन मुलांच्या पुनर्वसन व समाजात पुन्हा समावेशक होण्यासाठी सुरक्षित व सहाय्यकारी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai