रायगड जिल्ह्यात 315 अंगणवाड्या होणार स्मार्ट
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 01, 2025
- 23
मुंबई : महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाड्यांचे आधुनिकीकरण करण्यासाठी “स्मार्ट अंगणवाडी किट” खरेदीस राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील 315 अंगणवाडी केंद्रांना मंजुरी देण्यात आली असून, या केंद्रांचे रूपांतर आदर्श आणि अत्याधुनिक सुविधांनी युक्त ‘स्मार्ट अंगणवाड्यां’मध्ये करण्यात येणार आहे.
या योजनेमुळे प्रत्येक अंगणवाडीत शिक्षण, आरोग्य, पोषण, स्वच्छता व बालसंगोपनासाठी आवश्यक असणारे अत्याधुनिक साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. केंद्रांमध्ये मुलांसाठी आनंददायी, सुरक्षित आणि शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यास मदत होईल. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, स्मार्ट अंगणवाडी योजनेमुळे राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील लहान मुलांना सुरक्षित, स्वच्छ आणि आनंददायी शिक्षणाचे वातावरण उपलब्ध होईल. मुलांच्या सर्वांगीण विकासासोबतच महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना महत्त्वाचा टप्पा ठरेल.
रायगड जिल्ह्यातील माणगाव, तळा, श्रीवर्धन, रोहा, म्हसळा, महाड, अलिबाग, पोलादपूर, कर्जत, खालापूर, सुधागड आणि पनवेल या सर्व तालुक्यांतील अंगणवाड्या या योजनेत समाविष्ट आहेत. यामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील बालकांना दर्जेदार शिक्षण, पोषण आणि आरोग्यसेवा मिळणार असून स्थानिक अंगणवाड्या आधुनिक शिक्षण व आरोग्य विकासाचे केंद्र म्हणून विकसित होतील. या प्रकल्पामुळे अंगणवाडी सेविकांना तंत्रज्ञानाधारित शिक्षण पद्धती व पोषण व्यवस्थापनाचे प्रशिक्षण मिळणार आहे. तसेच, बालकांच्या वाढीचा, आरोग्याचा व पोषणस्थितीचा मागोवा घेण्यासाठी डिजिटल साधनांचा वापर होईल. नवीन अंगणवाड्या बालकांचे पोषण, आरोग्य तपासणी व पूर्व-शिक्षण अधिक परिणामकारकपणे पार पाडतील. तसेच गर्भवती व स्तनदा महिलांना आरोग्य सेवा आणि पोषण मार्गदर्शन सुलभपणे उपलब्ध होईल. महिला व बालविकास विभाग राज्यातील अंगणवाड्या सुसज्ज, आकर्षक आणि कार्यक्षम बनविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून ‘स्मार्ट अंगणवाडी योजना’ ही बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासनाने उचललेले अत्यंत महत्त्वाचे आणि दूरदृष्टीचे पाऊल ठरणार आहे.
- आवश्यकतेनुसार नवीन अंगणवाडी सुरू करावी
ज्या भागात लोकसंख्येप्रमाणे अंगणवाडी केंद्रांची आवश्यकता आहे, तिथे नव्याने अंगणवाडी सुरू करावी. तसेच मदतनीस व सेविकांच्या नियुक्तीसंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. 150 दिवसांच्या कामाचा आढावा, अंगणवाडी पर्यवेक्षिकांच्या पदोन्नती, अहिल्याभवन उभारण्यासाठी जागा निश्चितीकरण, बालसंगोपन योजनांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या. ज्या अंगणवाडीमध्ये विद्यार्थी जास्त आहेत मात्र, मदतनीस, सेविकांची संख्या कमी आहे. आणि जिथे विद्यार्थी कमी आहेत अशा अंगणवाड्यांमध्ये सेविकांची पुनर्नियुक्ती करावी. नवीन अंगणवाड्यांची आवश्यकता कुठे आहे यासदंर्भात सर्वेक्षण करून, त्याप्रमाणे त्या प्रदेशात अंगणवाडी, मदतनीस व सेविका यांची नियुक्ती करण्यात यावी. तसेच पर्यवेक्षिका, जिल्हा पर्यवेक्षिका यांना ग्रामविकास विभागातून महिला व बालविकास विभागात वर्ग करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai