सर्वांसाठी आरोग्य संकल्पनेस उत्स्फूर्त प्रतिसाद
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 22, 2025
- 56
‘प्रोजेक्ट सुविता’ अंतर्गत राज्यात 50 लाखांहून अधिक पालकांची नोंदणी पूर्ण
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मातृ आणि बाल आरोग्य सेवांमध्ये डिजिटल माध्यमातून मोठी प्रगती साधली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आणि संकल्पनेतून सुरू झालेल्या“प्रोजेक्ट सुविता” अंतर्गत 50 लाखांहून अधिक बालकांच्या पालकांची नोंदणी पूर्ण केली आहे. याशिवाय 40 लाख गर्भवती महिलांचा या उपक्रमात सहभाग नोंदविला गेला आहे. अशा प्रकारे राज्यात एकूण 94 लाख लाभार्थ्यांपर्यंत हा उपक्रम पोहोचला असून, हा जगातील सर्वात मोठ्या राज्य-नियंत्रित व वर्तनशास्त्र-आधारित आरोग्य संप्रेषण कार्यक्रमांपैकी एक ठरला आहे.
जुलै 2021 पासून राज्य शासनाने नॉन-प्रॉफिट संस्था ‘डेव्हलपमेंट कॉन्सोर्टियम प्रोजेक्ट सुविता’ यांच्या सहकार्याने एसएमएस रिमाइंडर कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमांतर्गत बालकांचे वेळेवर लसीकरण आणि गर्भवती महिलांसाठी मातृ आरोग्य सेवा वाढविण्यासाठी व्यक्तिनिष्ठ आणि वेळेवर पाठविले जाणारे एसएमएस संदेश दिले जातात. प्रत्येक संदेशात लसीचे नाव, त्या लसीने कोणत्या आजारांपासून संरक्षण होते याची माहिती आणि जवळच्या आरोग्य कर्मचाऱ्याशी संपर्क करण्याचे स्पष्ट आवाहन यांचा समावेश असतो.
हा उपक्रम वर्तनशास्त्र संशोधनावर आधारित असून, त्यात लाभार्थ्यांना आरोग्यविषयक निर्णय घेण्यासाठी सक्रिय प्रेरणा दिल्या जातात. जागतिक पातळीवरील संशोधनानुसार (अमेरिका, केनिया, नायजेरिया इ.) एसएमएस रिमाइंडरमुळे लसीकरण न झालेल्या मुलांची टक्केवारी सुमारे 15 टक्के नी घटते, असे आढळले आहे. सुविता प्रकल्पाच्या महाराष्ट्रातील सर्वेक्षणातही हेच निष्कर्ष दिसून आले आहेत. एसएमएस संदेशांमुळे पालकांचे आरोग्याविषयीचे ज्ञान वाढले असून ते वेळेवर लसीकरणासाठी आरोग्य केंद्रात येतात.
महाराष्ट्रातील सर्वेक्षणाचे निष्कर्ष
- प्रोजेक्ट सुविता 2025 मध्ये पालकांवर आणि 2023 मध्ये आशा कर्मचाऱ्यांवर घेतलेल्या सर्वेक्षणांमध्ये पुढील निष्कर्ष समोर आले आहेत. 1,192 पालकांपैकी 70 टक्के पालकांना सुविताकडून एसएमएस आल्याचे आठवते. त्यापैकी 48 टक्के पालकांनी संदेशातील विषय (लसीकरण किंवा मातृ आरोग्य) योग्यरीत्या ओळखला. 40 टक्के लाभार्थ्यांनी संदेश अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले, तर 5.6 टक्के साठी तो प्राथमिक माहितीचा स्रोत ठरला.
- 90 आशा कर्मचाऱ्यांपैकी 61 टक्के कर्मचाऱ्यांनी सांगितले की एसएमएस रिमाइंडरमुळे लसीकरणासाठी लाभार्थ्यांना एकत्र करणे अधिक सोपे झाले. त्यापैकी 36 आशा ताईंनी नमूद केले की काही पालक फक्त एसएमएस मिळाल्यामुळेच आरोग्य केंद्रात आले.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल सार्वजनिक आरोग्य विभागाचे अभिनंदन केले आहे. तसेच या कार्यक्रमाच्या यशामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या अधिकाऱ्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले आहे. प्रोजेक्ट सुविता टीमचेही कौतुक करण्यात आले असून, शासनाने भविष्यातही या भागीदारीतून राज्यातील लसीकरण 95 टक्के पेक्षा अधिक करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
- ‘प्रोजेक्ट सुविता’ हा उपक्रम म्हणजे तंत्रज्ञान, वर्तनशास्त्र आणि आरोग्यसेवा यांचा संगम आहे. या कार्यक्रमामुळे पालकांचे ज्ञान, सहभाग आणि आरोग्य प्रणालीवरील विश्वास वाढला असून, महाराष्ट्राने पुन्हा एकदा डिजिटल नवोपक्रमाच्या माध्यमातून सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात राष्ट्रीय नेतृत्व सिद्ध केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai