नागरी विमान वाहतूक क्षेत्रात टर्ब्युलन्स
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 06, 2025
- 55
इंडिगो एअरलाइन्सची 1300 विमाने तीन दिवसात रद्द
देशातील सर्वात मोठी एअरलाइन इंडिगोच्या बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार मिळून 1300 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. याचा फटका दिल्ली, बंगळुरु, हैदराबाद या ठिकाणच्या प्रवाशांना बसला. हा फटका नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने 1 नोव्हेंबरपासून नियमात केलेल्या बदलांमुळे झाला आहे. त्यामुळे अचानक हजारो विमाने रद्द झाल्याने नागरी विमान वाहतूक क्षेत्रात निर्माण झालेल्या टर्ब्युलन्सला सामोरे जाण्यासाठी डीजीसीएने एफडीटीएल नोटिफिकेशन लागू करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली. त्यामुळे येत्या 48 तासात विमान वाहतुक सुरळित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
देशात इंडिगो एअरलाइन्सचा प्रवासी विमान वाहतुकीतील हिस्सा 65 टक्के आहे. इंडिगोनंकडून 2200 फ्लाईट एका दिवसात चालवल्या जातात. इंडिगो कंपनी वक्तशीरपणाबद्दल आणि झटपट सेवेबद्दल ओळखली जाते. या प्रतिमेची गेल्या काही दिवसांमध्ये धूळधाण उडाली. एरवी या कंपनीची 80 टक्के उड्डाणे वेळेत होतात. पण 1 डिसेंबर रोजी हे प्रमाण 50 टक्क्यांवर आले. ही घसरण 2 डिसेंबर (35 टक्के) आणि 3 डिसेंबर रोजीही (19.5 टक्के) सुरूच होती. एका उड्डाणाला तर 10 तास विलंब झाला.
एफडीटीएलचे नियम जानेवारी 2024 मध्ये मंजुर करण्यात आले असले त्याची अंमलबजावणी 1 नोव्हेंबर 2025 पासून सुरु कऱण्यात आली होती. यामध्ये पायलट आणि क्रू मेंबर्सची आठवड्यात 36 तास असलेली सुट्टी वाढवून 48 तास करण्यात आली. नाईट लँडिंगची संख्या 6 वरुन प्रत्येक आठवड्यात 2 वर आणण्यात आली होती. रात्रीच्या वेळी 8 तास उड्डाणाची मर्यादा घालण्यात आली होती. नाईट ड्युटी विंडो रात्री 12.00 ते पहाटे 6.00 करण्यात आली होती. वैमानिक आणि कक्ष कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासांवर मर्यादा आल्यामुळे इंडिगोचा अवाढव्य पसारा सांभाळण्यासाठी पुरेसे मनुष्यबळच सध्या कंपनीकडे उपलब्ध नाही. या परिस्थितीत नजीकच्या काळातही सुधारणा होण्याची शक्यता कमीच.
परंतु, या नियमांची अंमलबजावणी करण्याची मुदत वाढवली जाईल असं इंडिगोला वाटलं होतं. मात्र, डीजीसीएकडून मुदतवाढ देण्यात आली नाही. या नियमांच्या अमलबजावणीमुळे इंडिगो एअरलाईन्सला बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार या तीन दिवसांत 1300 हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द करावे लागल्याने प्रवाशांची मोठी अडचण निर्माण झाली. इंडिगो एअरलाइन्सची दररोज 400 हून अधिक उड्डाणे रद्द झाल्याने इतर विमान वाहतुक कंपन्यांनी त्यांचे दर वाढवल्याने त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसला आहे. त्यातच प्रवाशांना कोणतीही आगाऊ सूचना न मिळाल्याने एकच गदारोळ मुंबई, दिल्ली, बंगळुरु, हैदराबाद या विमानतळावर पाहायला मिळाला आहे.
देशभरातील विविध विमानतळांवर हजारो प्रवासी अडकून पडले आहेत. प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. देशभरातील प्रत्येक विमानतळांवर प्रवाशांचा संताप पाहायला मिळत आहे. झालेल्या प्रकाराची केंद्र सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली असून याबाबत उच्चस्तरीय चौकशी होणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. परिस्थिती पूर्णपणे सुरळीत करण्यासाठी सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. मंत्रालयात 247 नियंत्रण कक्ष उभारण्यात आला असून तेथून परिस्थितीवर देखरेख ठेवली जात आहे. दरम्यान, देशातील नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील अचानक निर्माण झालेल्या टर्ब्युलन्समधून मार्ग काढण्यासाठी डीजीसीएने अखेर 1 नोव्हेंबरपासून एफडीटीएल नोटिफिकेशन लागू करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.
- ‘बदललेल्या नियमांचा फटका
इंडिगोला अचानक मनुष्यबळाचा तुटवडा जाणवण्यामागे नागरी विमानवाहतूक महासंचालनालयाने कामाच्या तासांबाबत नव्याने बनवलेली नियमावली कारणीभूत ठरत आहे. ही नवी नियमावली दोन टप्प्यांमध्ये राबवली जात आहे. यातील पहिला टप्पा जुलै महिन्यात अमलात आला, तर दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी नोव्हेंबर महिन्यापासून सुरू झाली. डीजीसीएने बनवलेल्या या नियमांअंतर्गत, वैमानिकाचे कामाचे तास 48 वरून 36 करण्यात आले आहेत. शारीरिक आणि मानसिक थकवा कमी व्हावा हा यामागील उद्देश. याशिवाय रात्री विमाने उतरवण्याची मुभा सहावरून दोनवर करण्यात आली आहे. दैनिक कामाचे 8 तास, साप्ताहिक कामाचे 35 तास, मासिक कामाचे 125 तास आणि वार्षिक 1000 तास अशा मर्यादा घालून देण्यात आला आहेत. वैमानिकांना थकवा येऊन उड्डाणांमध्ये जोखीम निर्माण होऊ नये यासाठी ही खबरदारी घेतली जात असली, तरी या व्यवस्थेमध्ये अधिक संख्येने वैमानिक आणि कर्मचारी लागणार हे उघड आहे. इंडिगोची या बदलासाठी तयारीच पुरेशी नव्हती. तशात नोव्हेंबर-डिसेंबर हा वाढीव उड्डाणांचा काळ मानला जातो. सुट्ट्यांच्या काळात जवळपास 6 टक्के उड्डाणे अतिरिक्त असतात. एकीकडे ही वाढीव उड्डाणे आणि दुसरीकडे नियमांच्या मर्यादेतून घटलेले वापरण्याजोगे मनुष्यबळ अशा दुहेरी कात्रीत इंडिगो सध्या अडकली आहे.
- एफडीटीएलच्या अंमलबजावणीमुळं इंडिगोच्या मोठ्या प्रमाणात पायलटला आवश्यक सुट्टी देण्यात आली होती. एअरबस 320 च्या सॉफ्टवेअर अपडेशन मुळं वीकेंड लांबला, विमानाची उड्डाणं लांबली. उशिरा उड्डाण झाल्यानं अनेक पायलटची ड्यूटी नाईट विंडोमध्ये गेली. त्यामुळं सोमवारी एफडीटीएल लागू झाल्यानं क्रू मेंबर्स ऑटोमेटिक अनिवार्य रेस्टवर गेले. मोठ्या संख्येनं क्रू मेंबर्स उपलब्ध नसल्यानं इंडिगोचं वेळापत्रक कोलमडलं. विंटर शेड्यूल 26 ऑक्टोबरपासून वाढल्यानं फ्लाइटसची संख्या वाढली, यामुळं अडचणी वाढल्या.
- डिगडीजीसीएने एफडीटीएल नियमावलीतील साप्ताहिक सुट्टी संदर्भातील नियम मागे घेण्यात असल्याचे जाहीर केले. इंडिगोने पुढील 48 तासात सर्व परिस्थिती नियंत्रणात येईल असं सांगण्यात आले आहे. इंडिगोच्या टीम चोवीस तास काम करत असून प्रवाशांची गैरसोय रोखण्याचा प्रयत्न केला जातोय, असं इंडिगोने सांगितले.
- इतर विमान कंपन्यांचे काय?
इतर कंपन्या म्हणजे एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, अकासा एअरलाइन्स आणि स्पाइस जेट यांचा आकार इंडिगोइतका नाही. शिवाय या कंपन्यांची रात्रीची उड्डाणे तुलनेने कमी आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील मर्यादांची फारशी झळ या कंपन्यांना इंडिगोच्या तुलनेत कमी प्रमाणात पोहोचली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai