हापूससह कलिंगडची आवक

नवी मुंबई : एपीएमसीमधील पाचही मार्केट सुरळीत सुरू झाले आहेत. फळ मार्केटमध्ये हापूससह कलिंगडची आवक वाढू लागली आहे. आंब्याची निर्यातही सुरू झाल्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

मंगळवारी फळ मार्केटमध्ये 180 ट्रक व टेंपोची आवक झाली आहे. रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 30 हजार पेट्या हापूस विक्रीसाठी मार्केटमध्ये आला आहे. दक्षिणेकडील राज्यातून बदामी व इतर आंबाही विक्रीसाठी येत आहे. घाऊक मार्केटमध्ये 200 ते 500 रूपये डझन व किरकोळ मार्केटमध्ये 400 ते 1 हजार रूपये डझन दराने हापूसची विक्री होत आहे. जवळपास 50 ट्रक व टेंपोमधून कलिंगड विक्रीसाठी आले आहे. रमजान सुरू होणार असल्यामुळे कलिंगडला मागणी वाढण्याची शक्यता आहे. कोबी, फ्लॉवर, शेवगा शेंग, टोमॅटोची आवक सर्वाधिक होत आहे. कांदा व बटाटा एपीएमसीच्या बाहेरही मोठ्याप्रमाणात उपलब्ध होत असल्यामुळे बाजारसमितीमध्ये ग्राहकांची संख्या रोडावली आहे.