सुपर बाईकची धूम ठरली अखेरची

राईड दरम्यान तरुणाचा मृत्यू

नवी मुंबई : मित्राने नवीनच घेतलेल्या सुपर बाईकवरची धूम जिवावर बेतल्याचा प्रकार सोमवारी नवी मुंबईतील पामबीच मार्गावर घडला. सुपर बाईकची धूम ठोकत असताना तोल गेल्याने दुभाजकाला धडक होऊन एका तरुणाचा अंत झाला आहे. 

कोपरखैरणे येथे राहणार्‍या अरबाज अन्सारी याने हायाबुसा ही सुपर बाईक घेतली होती. ती पाहण्यासाठी त्याचाच तळोजा येथील मित्र स्वप्निल चंद्रकांत झिंगाडे (वय 26) हा कोपरखैरणेला आला होता. दोघेही बायकर असून जुने मित्र आहेत. त्यामुळे स्वप्निल हा सुपर बाईकची पहिली राईड घेण्यासाठी पामबीच मार्गावर आला होता.

पामबीचमार्गे तो सीबीडीच्या दिशेने जात असताना नेरुळ तलावालगत त्याचा तोल गेला. यामुळे बाईक उजवीकडे कलंडली असता, स्वप्निल हा खाली पडून रस्त्याच्या दुभाजकावरील तारेत अडकून पडला, तर मोटरसायकल सुमारे 200 मिटर अंतरापर्यंत घासत गेली. हा अपघात पाहताच प्रत्यक्षदर्शी आणि वाहतूक पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली. मात्र, दुभाजकावर आदळल्याने स्वप्निलचा जागीच मृत्यू झाल्याचे वरिष्ठ निरीक्षक श्याम शिंदे यांनी सांगितले.ताबा सुटल्याने दुर्घटनाअपघाताच्या वेळी सुपर बाईक अधिक वेगात होती. त्यामुळे स्वप्निलचा ताबा सुटल्याने हा अपघात घडला. या प्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.