खारघरहून थेट मुंब्रा नवा मार्ग

10 कोटी रुपये खर्च अपेक्षित 

पनवेल ः नवनवीन गृहप्रकल्पामुळे लोकसंख्या वाढत आहे, परिणामी वाहतूकीवर याचा परिणाम होत आहे. त्यामुळे दळणवळणाची योग्य सेवा देण्याच्या हेतूने खारघर-मुंब्रा नवा मार्ग अस्तित्वात ेयेणार आहे. रोंहिजण गावाजवळून थेट पनवेल मुंब्रा महामार्ग गाठणे आता सोपे होणार आहे. यासाठी पनवेल महापालिकेकडून 10 कोटी रुपये खर्च करून नवा रस्ता बांधण्यात येणार आहे.

खारघर सेक्टर 36, 37, 38 आदी भागांतून मुंब्रा, कल्याण, ठाणे या भागाकडे जाण्यासाठी खारघरमधून एकमेव रस्ता आहे. तळोजा पाचनंद गावाजवळून हा रस्ता जोडला जातो. पनवेल महापालिकेने सध्याचे नागरिक आणि भविष्यात या भागात राहण्यासाठी येणार्‍या नव्या गृहप्रकल्पातील नागरिकांची गरज ओळखून नवा रस्ता उभारण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी या भागातील नागरिकांना अवघ्या काही मिनिटांत पनवेल-मुंब्रा मार्गांवरील खुटारी गावाच्या पुढे निघता येणार आहे. त्यामुळे शिघ्रकृती दलाच्या बटालियनजवळून जाणार्‍या रस्त्याला वळसा घालण्याचे गरज लागणार नाही. याशिवाय महापालिका क्षेत्रातील या भागात राहणार्‍या नागरिकांनादेखील खारघरमध्ये जाण्यासाठी जवळचा मार्ग तयार होणार आहे.

35 मीटर रुंदीचा हा मार्ग तयार करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. गणेश देशमुख यांनी पुढाकार घेतला आहे. या रस्त्यासाठी पनवेल महापालिकेला 12 हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार असून, हा रस्ता कॉक्रिटीचा असणार आहे. पुढे महामार्गाला जोडण्यासाठी दीड किलोमिटरचा सेवा रस्तादेखील काढण्यात येणार आहे. या सर्वांसाठी महापालिकेला 10 कोटी रुपये खर्च येणार आहे. याशिवाय जमीनसंपादन प्रक्रियेसाठी महापालिका जमीनमालकांना टीडीआरच्या स्वरूपात मोबदला देणार आहे. त्यामुळे महापालिकेला संपादनप्रक्रियेसाठी पैसे मोजावे लागणार नाहीत.

रोहिंजण गावातील शेतकर्‍यांची जमीन यासाठी संपादित होणार आहे. कल्याण, ठाणे, मुंब्रा, शिळफाटा आदींसह ठाणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात नोकरी, व्यवसाय करणार्‍यांसाठी हा रस्ता महत्त्वाचा ठरणार आहे. सिडकोची मेट्रो सुरू झाल्यानंतर बेलापूरहून खारघर सेक्टर 36, 38चा प्रवास आणि तिथून हा जोडरस्त्याचा वापर नागरिकांना करता येणार असल्यामुळे त्यांनी रस्त्याबाबत समाधान व्यक्त केले आहे. पनवेल महापालिकेने नागरिकांना चांगली सुविधा द्यावी या हेतून हा रस्ता तयार केला असून अशा पद्धतीचे रस्ते रस्त्यावरील वाहतूककोंडी कमी करण्यास फायदेशीर ठरतील, असा पालिकाआयुक्त देशमुख यांनी व्यक्त केला.