पावसाळापूर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत

आमदार गणेश नाईक यांची पालिका प्रशासनाला सूचना

नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिकेची प्रशासकीय यंत्रणा कोरोना प्रतिबंधाच्या कामात गुंतली असली तरी पावसाळापूर्व कामांनाही प्राधान्य देऊन ही कामे 31 मे पर्यंत पूर्ण करावीत अशी सूचना आमदार गणेश नाईक यांनी केली आहे. महापालिका आयुक्त आणि पालिका प्रशासकांना त्यांनी यासंदर्भात 13 मे रोजी पत्र पाठवले आहे.

पावसाळा तोंडावर आलेला आहे. शहरात नालेसफाई ,रस्त्यांची दुरुस्ती, ड्रेनेजची दुरुस्ती व सफाई तसेच इतर अत्यावश्यक कामे लवकरात लवकरात लवकर पूर्ण होण्याची आवश्यकता आहे. ही कामे पूर्ण न झाल्यास पावसाळ्यात शहरातील अनेक ठिकाणी पाणी तुंबून संकटकालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते. आणि म्हणूनच कोविड-19 नियमांचं पालन करून पावसाळापूर्व कामे 31 मे पूर्वी मार्गी लागली पाहिजेत असे  नाईक यांनी सांगितले. पावसाळ्यामध्ये आरोग्य विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाची जबाबदारी वाढते. साथीचे आजार उद्भवू शकतात. पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीमध्ये नागरिकांना योग्य ती मदत पुरवावी लागते. त्यांच्या राहण्याची आणि  जेवणाची व्यवस्था करावी लागते. या सर्व बाबींचे पालिका प्रशासनाने वेळीच नियोजन करावे असा सल्ला देखील नाईक यांनी दिला आहे.