नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण

मुंबई ः राज्यात कोरोनाचे थैमान सुरुच आहे. सर्वसामान्यांपासून राजकीय, सिनेसृष्टीतील मंडळींना सुद्धा कोरोनाची लागण होण्याचे सत्र सुरूच आहे. नुकतचं शिवसेनेचे दिग्गज नेते तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्नं झालं आहे. शिंदे यांनी याबाबत स्वतः सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत होती त्यामुळे त्यांनी काल आपली कोरोना चाचणी केली असता, त्यात ते पॉझिटिव्ह आढळले आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर पुढील उपचार केले जाणार आहे. तसेच त्यांनी संपर्कात आलेल्या लोकांनी सुद्धा आपली कोरोनाची चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे की, काल मी माझी कोव्हीड-19 ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची कोव्हीड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, ही विनंती. असे ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे.