कोव्हीड तपासणी शिबीरास उद्योग समुहांचे सहकार्य

नवी मुंबई ः खबरदारीची उपाययोजना म्हणून महापालिकेच्यावतीने एम.आय.डी.सी. भागातील विविध कंपन्यांमध्ये कोव्हीड 19 तपासण्या करण्यास सुरूवात करण्यात आलेली आहे. त्या अंतर्गत महापे येथील निर्मल कार्यालय तसेच झायडस कंपनी याठिकाणी कोव्हीड तपासण्या करण्यात आल्या. एम.आय.डी.सी. क्षेत्रात ही मोहीम राबविण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक महामंडळ, ठाणे बेलापूर इंडस्ट्रिज असोसिएशन अशा विविध प्राधिकरण, संस्थाचे महत्वपूर्ण सहकार्य लाभत आहे.

एम.आय.डी.सी. क्षेत्रातील ही विशेष कोव्हीड तपासणी मोहीम राबविण्यासाठी उपआयुक्त राजेश कानडे यांची मुख्य समन्वयक म्हणून नियुक्ती केलेली असून डॉ. सचिन नेमाने यांच्या नियंत्रणाखाली विशेष तपासणी पथकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. या पथकांनी आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी डी.बी.पाटील यांच्या पुढाकारातून मंडळाचे महापे येथील निर्मल कार्यालय तसेच झायडस कंपनी याठिकाणी कोव्हीड तपासण्या केल्या. यामध्ये 202 अधिकारी, कर्मचारी यांच्या अँटिजेन चाचण्या करण्यात आल्या असून त्यामध्ये सर्वांचे टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झालेले आहेत. तथापि त्यामधील 47 व्यक्तींची लक्षणे पाहून त्यांच्या आर.टी.-पी.सी.आर. टेस्ट करण्यात आल्या आहेत. कोणतीही संशयित व्यक्ती कोव्हीड तपासणीपासून वंचित राहू नये ही आयुक्तांची भूमिका असून दररोज 1 हजार आर.टी.-पी.सी.आर. चाचण्यांची क्षमता असणारी महानगरपालिकेची स्वत:ची अद्ययावत व स्वयंचलित प्रयोगशाळा आहे. त्यामुळे ‘मिशन ब्रेक द चेन’ मोहीमेअंतर्गत ट्रेस, टेस्ट, ट्रिट या त्रिसूत्रीवर भर देण्यात येत आहे. या अनुषंगाने ए.पी.एम.सी. मार्केट प्रमाणेच एम.आय.डी.सी. क्षेत्रातील कंपन्या या कोव्हीडच्या दृष्टीने जोखमीच्या भागांकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे.