नवी मुंबईत 1 लाखाहून अधिक कुटुंबांचे सर्वेक्षण

नवी मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या वतीने 15 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या ‘माझे कुटुंब - माझी जबाबदारी’ या राज्यव्यापी मोहीमेत नवी मुंबई महानगरपालिकेने आघाडी घेत घरोघरी जाऊन सर्वेक्षणास सुरूवात केलेली असून 28 सप्टेंबरपर्यंत 1 लक्ष 19 हजार 892 कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या 3 लक्ष 83 हजार 342 नागरिकांच्या सर्वेक्षणात 266  नागरिकांना सारी, आय.एल.आय. ची लक्षणे आढळलेली असून 46 नागरिकांमध्ये कोव्हीड सदृष्य लक्षणे असल्याचे दिसून आले आहे. यामधील 234 नागरिकांना उपचारासाठी संदर्भित करण्यात आलेले आहे. 
पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रत्येक पथकात  2 ते 3 करोनादूतांचा समावेश असलेली 720 पथके तयार करण्यात आलेली आहेत. या सर्वेक्षणांतर्गत ही पथके घरोघरी जाऊन प्रत्येक नागरिकाचे शारीरिक तापमान तसेच ऑक्सिजन पातळी तपासत असून नागरिकाची आरोग्य विषयक माहिती अ‍ॅपमध्ये नोंदवून घेत आहेत. 
10 ऑक्टोबर पर्यंत या मोहिमेच्या पहिला टप्प्यातील सर्वेक्षणाची कार्यवाही करण्यात येणार असून नागरिकांचे शारीरिक तापमान, ऑक्सिजन सॅच्युरेशन मोजून नोंदविण्यासोबतच घरातील एखाद्या व्यक्तीला ताप  खोकला, घशात खवखवणे, थकवा, श्‍वास घेण्यास त्रास अशाप्रकारचा त्रास होत आहे काय याचीही माहिती घेतली जात आहे. तसेच कोणत्या व्यक्तीस मधुमेह, हृदयरोग, कर्करोग, किडनीचे आजार, अवयव प्रत्यारोपण, दमा अशा सहव्याधी (को-मॉर्बिडिटी) आहेत काय याबाबतचीही माहिती संकलित केली जात आहे. त्याचप्रमाणे कुटुंबातील सदस्यांना नियमित मास्क लावणे, वारंवार हात धुणे, सॅनिटायझर वापरणे, आजार न लपवता आवश्यकता भासल्यास फिव्हर क्लिनिकमध्ये जाऊन तपासणी करणे, काही  सहव्याधी (कोमॉर्बिडिटी) असल्यास नियमित औषधोपचार घेणे, प्लाझमा डोनेशन अशा विविध प्रकारची कोरोना विषयक माहिती दिली जात आहे. दिनांक 14 ते 23 ऑक्टोबर या कालावधीत या मोहिमेचा दुसरा टप्पा राबविला जाणार असून या पथकांमार्फत पुन्हा सर्व घरांना भेटी देऊन सर्वांचे शारीरिक तापमान आणि ऑक्सिजन सॅच्युरेशन दुसर्‍यांदा मोजले जाणार आहे. तसेच त्यावेळेची आरोग्य स्थिती जाणून घेतली जाणार आहे. या सर्वेक्षणातून संकलीत होणार्‍या माहितीच्या आधारे लक्षणे आढळणार्‍या नागरिकांना लक्षणांच्या तीव्रतेनुसार लगेच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. अशाप्रकारे पथकांमार्फत होत असलेल्या सर्वेक्षणात आढळलेल्या 234 नागरिकांना संदर्भित करण्यात आलेले आहे.
त्याचप्रमाणे सर्वेक्षणात नोंदीत सहव्याधी (कोमॉर्बिड) असणार्‍या किंवा इतर नागरिकांना कोरोनाची लागण झाल्यास वेळेत योग्य उपचार उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. महत्वाचे म्हणजे लवकर रूग्णशोध (ट्रेस) व त्यांची तपासणी  (टेस्ट) होऊन त्वरित उपचार (ट्रिट ) सुरू झाल्याने मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मोलाची मदत होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी संपूर्ण सहकार्य करावे आणि कोव्हीडच्या विषाणूला स्वत:पासून व कुटुंबियांपासून  ूर ठेवावे असे आवाहन आयुक्त बांगर यांनी केले आहे.