फोर्टिस रूग्णालयातील पालिकेचा कोटा कोविड, नॉन कोविड रुग्णांसाठी वापरावा
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 08, 2020
- 625
कोरोना प्रतिबंधात्मक आढावा बैठकीत आ. नाईकांची आयुक्तांना सूचना
नवी मुंबई ः आमदार गणेश नाईक यांनी सोमवारी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याबरोबर घेतलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक आढावा बैठकीत त्यांनी केलेल्या सुचनांनुसार अनेक महत्वाचे जनहिताचे निर्णय घेण्यात आले. वाशीतील फोर्टिस रूग्णालयात जो पालिकेचा रूग्ण उपचाराचा कोटा आहे तो कोविड आणि नॉन कोविड रुग्णांसाठी वापरण्यात येणार आहे. नॉन कोविड उपचारांसाठी पालिका ओपीडी सुरू करणार असून पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी अॅप विकसीत करण्याबरोबरच त्यांना छापील अभ्यासक्रम देवून तो करवून घेतला जाणार आहे.
पालिकेची सर्व नागरी आरोग्य केंद्रे कोविडवर उपचार करण्यासाठी कार्यरत असताना कोविड व्यतिरिक्त इतर उपचारासाठी नागरिक या केंद्रांवर येत नाहीत. पावसाळयाचे दिवस पाहता इतर आजारांसाठी सुयोग्य ठिकाणी पालिकेने बाहय रूग्ण विभाग सुरू करावेत, अशी सुचना आ. नाईक यांनी केली असता आयुक्त बांगर यांनी ती मान्य केली. वाशीतील फोर्टिस रूग्णालयाबरोबर पालिकेने केलेल्या करारानुसार 600 रूग्णांना उपचारासाठी पालिकेचा कोटा आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता मागील सहा महिन्याचा कोटा व पुढील कोटा कोविड आणि नॉन कोविड रुग्णांसाठी वापरावा या त्यांच्या सुचनेस देखील आयुक्तांनी होकार दर्शवला. ऑनलाईन शिक्षणापासून आजही पालिका शाळांमध्ये विद्यार्थी वंचित आहेत. त्यांच्या करीता अॅप विकसीत करण्याची सुचना माजी आ.संदीप नाईक यांनी मागील बैठकीत केली होती त्यानुसार शिक्षण खात्याच्या अधिकार्यांना आयुक्तांनी निर्देश दिले आहेत. माजी महापौर सुधाकर सोनावणे यांनी केलेल्या मागणीनुसार विद्यार्थ्यांना छापील अभ्यासक्रम देवून तो शिक्षकांनी त्यांच्याकडून करवून घेण्याचा आ.नाईक यांचा सल्ला देखील आयुक्तांनी मान्य केला. नागरी हिताच्या कामांच्या निविदा मंजूर करताना पालिकेतील काही अधिकारी स्वतःच्या मर्जीतील लोकांना कामे मिळावीत यासाठी प्रत्येकवेळी निविदेत खुसपट काढून त्या नामंजूर करतात त्यामुळे अशा अधिकार्यांची साखळी खंडीत करावी, असे आवाहन त्यांनी पालिका आयुक्तांना यावेळी केले.
चौकट
बारवीमधील पालिकेचा पाणी हिस्सा अबाधित राहिल यांची दक्षता घेणार
नवी मुंबई महापालिका क्षेत्रासह जिल्हयातील मिरा भाईंदर, उल्हासनगर इतर काही शहरांमध्ये एमआयडीसीच्या बारवी धरणातून पाणीपुरवठा होत असतो. हे धरण एका पालिकेला विकण्याचे घाटत आहे. असे झाले तर या धरणातून नवी मुुंबईला होणारा पाणीहिस्सा भविष्यात अबाधित राहिल, यासाठी सतर्क राहण्याचा निर्धार आ. गणेश नाईक यांनी व्यक्त केला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai