‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमानिमित्त विशेष आरोग्य शिबीर
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 11, 2026
- 17
नवी मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त अत्यंत भव्य स्वरुपातील कार्यक्रम 28 ते 01 मार्च 2026 या कालावधीत सेक्टर 29 खारघर येथील ओवे मैदानात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने 10 फेब्रुवारी, ते 25 फेब्रुवारी, 2026 या कालावधीत नमुंमपा आरोग्य विभागाच्या वतीने विशेष आरोग्य अभियान राबविण्यात येत आहे.
श्री गुरु तेगबहादूर साहिब यांचा प्रेरणादायी वारसा जपत त्याला आधुनिक भारताच्या सुशासनाची जोड देत प्रशासन आणि नागरिक यांनी एकत्रित येऊन ‘हिंद-दी-चादर’ हा कार्यक्रम राबविला जात आहे. श्री गुरु तेगबहादूर साहिब यांचा गौरवशाली इतिहास सर्वांना माहित व्हावा यादृष्टीने राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या अनुषंगाने नवी मुंबई महापालिकेच्या वतीने महापौर सुजाता पाटील व महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध लोकोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत तसेच जगभरातून येणाऱ्या नागरिकांसाठी आवश्यक सोयीसुविधांची पूर्तता करण्यात येत आहे. अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार हे नवी मुंबई महापालिकेच्या वतीने समन्वयक अधिकारी असणार असून संबंधित विभागप्रमुखांकडे जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने नागरिकांचे आरोग्य आणि सक्षमीकरण हे कुटुंबांच्या, समाजाच्या तसेच संपूर्ण देशाच्या प्रगतीसाठी केंद्रस्थानी आहे हे लक्षात घेत दि.10 फेब्रुवारी, ते 25 फेब्रुवारी, 2026 या कालावधीत नमुंमपा आरोग्य विभागाच्या वतीने विशेष आरोग्य अभियान राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने नवी मुंबई पालिकेची सर्व रुग्णालये आणि नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे यांच्यामार्फत नवी मुंबई पालिका कार्यक्षेत्रामध्ये 25 फेब्रुवारी पर्यंत 124 शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या अंतर्गत नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत असून त्यामध्ये, उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्या निदानासाठीची तपासणी करणे. तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या तोंडाच्या कर्करोग निदानासाठीची तपासणी करणे, माता व बाल आरोग्य आणि लसीकरण, क्षयरोग होण्याची अतिजोखीम असलेल्या महिलांची क्षयरोग निदानासाठीची तपासणी करणे. सिकलसेल रोग तपासणी करणेआदी तपासण्या करण्यात येत आहेत. याकरिता अनुभवी स्त्रीरोगतज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, कान नाक व घसा रोग तज्ज्ञ, त्वचारोग तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, दंत शल्यचिकित्सक अशा तज्ज्ञांच्या सेवा दिल्या जात आहेत.
‘हिंद-दी-चादर’ उपक्रमाच्या अनुषंगाने 10 फेब्रुवारी, 2026 रोजी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत जवादे यांच्या नियंत्रणाखाली नवी मुंबई महापालिकेच्या वाशी व नेरुळ रुग्णालयात तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र वाशी आणि नेरूळ 2 या ठिकाणी विशेष आरोग्य शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरांना नागरिकांचा, विशेषत्वाने महिलांचा मोठया प्रमाणात प्रतिसाद लाभला. अशा प्रकारे ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमानिमित्त पालिकेच्या रुग्णालयांमध्ये व नागरी आरेाग्य केंद्रांमध्ये 25 फेब्रुवारी पर्यंत दररोज आयोजित करण्यात येणाऱ्या आरोग्य शिबीरांचा लाभ नवी मुंबईकर नागरिकांनी मोठया संख्येने घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai