वॉर्डबॉयचा हलगर्जीपणा तरुणीच्या जीवावर
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 11, 2026
- 23
नवी मुंबई : वैद्यकीय पात्रता नसतानाही स्वतःला डॉक्टर म्हणून सादर करून उपचार करणाऱ्या एका वॉर्डबॉयच्या हलगर्जीपणामुळे 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना 5 फेब्रुवारी रोजी वाशी येथे घडली. प्रचिती भुवड (वय 21) असे मृत तरुणीचे नाव असून, या प्रकरणी संदेश पाष्टे (वय 30, रा. मानखुर्द) याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे शहरात सुरू असलेल्या अनधिकृत उपचारपद्धतींबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
पोलिस तपासानुसार, संदेश पाष्टे हा अंधेरी येथील एका खासगी नर्सिंग होममध्ये वॉर्डबॉय म्हणून कार्यरत आहे. मात्र, मानखुर्द व परिसरात तो स्वतःला डॉक्टर म्हणून सादर करत रुग्णांवर उपचार करत असल्याचे उघड झाले आहे. कोणतीही वैद्यकीय पदवी अथवा अधिकृत नोंदणी नसतानाही तो इंजेक्शन्स देत असल्याची बाब तपासात समोर आली आहे. प्रचिती भुवड ही वाशी येथे कुटुंबासह राहत होती. तिला हार्मोनल आजार असल्याने उपचारासाठी कुटुंबीयांनी ओळखीच्या माध्यमातून संदेश पाष्टेला घरी बोलावले. 5 फेब्रुवारी रोजी पाष्टेने तिची तपासणी करून एक इंजेक्शन दिले. त्यानंतर काही वेळातच प्रचितीची प्रकृती बिघडली. त्रास वाढत असल्याचे लक्षात येताच, कोणताही तज्ज्ञ सल्ला न घेता पाष्टेने दुसरे इंजेक्शन दिले. मात्र, यानंतर तिची अवस्था अधिक गंभीर झाली आणि काही वेळातच तिचा मृत्यू झाला. मुलीचा अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना संशय आला. प्रचितीचे वडील भिकुराम भुवड यांनी वाशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू करून 6 फेब्रुवारी रोजी आरोपीला अटक केली. तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीने प्रचितीच्या उपचारासाठी 15 हजार रुपये घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधित आजारावरील उपचारासाठी साधारणपणे कमी शुल्क आकारले जाते. मात्र डॉक्टर असल्याचे भासवून मोठी रक्कम घेतल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. प्रचितीला नेमकी कोणती इंजेक्शन्स देण्यात आली, ती औषधे कायदेशीर होती का, तसेच डोस चुकीचा होता का, याबाबत सखोल तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
या प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांनी सांगितले की, ‘आरोपी डॉक्टर नसतानाही उपचार करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. नागरिकांनी उपचार घेताना संबंधित व्यक्तीची वैद्यकीय पात्रता आणि नोंदणी तपासणे आवश्यक आहे. बनावट डॉक्टरांविरोधात कठोर कारवाई केली जाईल.’ या घटनेमुळे नवी मुंबई व मुंबई परिसरात सुरू असलेल्या बोगस डॉक्टरांच्या प्रकारांबाबत पुन्हा एकदा गंभीर इशारा मिळाला असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai