मंदिरे उघडण्यासाठी भाजपचे आंदोलन

नवी मुंबई ः मंदिरे उघडण्यासाठी भाजपचे राज्यव्यापी घंटानाद आंदोलन सुरु आहे. नवी मुंबईतूनही या आंदोलनाला प्रतिसाद मिळाला आहे. मंगळवारी नवी मुंबई शहर भाजपाच्यावतीवतीने शहरातील विविध देवी-देवतांच्या मंदिर आवारात आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या नेतृत्त्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी सरकारविरोध घोषणांनी परिसर दणाणून गेला. 

कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर गेल्या सहा महिन्यांपासून सर्व मंदिरे, धार्मिक स्थळे बंद आहेत. राज्य सरकारने राज्यात दारूची दुकाने आणि बार सुरू केले, परंतु राज्यातील धार्मिक स्थळे व मंदिरे अद्याप कुलुपांनी जखडलेली आहेत. या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्यावतीने राज्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात आले. याच अनुषंगाने नवी मुंबईतील सीवूड येथील शनी मंदिरासमोर जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत, दत्ता घंगाळे, तसेच कोपरखैरणे येथील दत्त मंदिराजवळ ज्येष्ठ नेते आमदार गणेश नाईक, शिरवणे येथील गणेश मंदिराजवळ महापौर जयंत सुतार, तुर्भे येथील हनुमान मंदिराजवळ अमित मेढेकर याप्रमाणे भाजपा पदाधिकार्‍यांनी नेरूळ पश्‍चिम सेक्टर 18 मधील शिव मंदिर, दिघा येथील सिद्धिविनाक मंदिरासमोर जिल्हाध्यक्ष रामचंचंद्रजी घरत यांच्या नेतृत्त्वाखाली मंदिराचे दरवाजे खुले करण्यासाठी व सर्व जनतेला देवी- देवतांचे दर्शन घेण्यासाठी आंदोलन करण्यात आले.