नवी मुंबईत ‘राष्ट्रीय डाक सप्ताह’ उत्साहात

नवी मुंबई : दीडशे वर्षांपासून ग्राहकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या भारतीय डाक विभागामार्फत 9 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीमध्ये ‘राष्ट्रीय डाक सप्ताह’ उत्साहात साजरा करण्यात आला. या पार्श्‍वभूमीवर नवी मुंबई डाक विभागामार्फत विविध कार्यक्रम राबविण्यात आले. 

09 ऑक्टोबर रोजी जागतिक टपाल दिनाच्या निमित्ताने सर्व टपाल कर्मचार्‍यांसाठी ऑनलाइन ‘ताणतणाव व्यवस्थापन शिबिर’ आयोजित करण्यात आले, तसेच नागरिकांच्या प्रतिनीधींची ‘पोस्ट फोरम सभा’ विविध टपाल कार्यालयांमध्ये आयोजित करण्यात आली. 10 ऑक्टोबरला डाक बँकिंग दिवसाच्या निमित्ताने डाक विभागाच्या विविध बचत योजनांसंदर्भात नागरिकांमधे जनजागृती करण्यात आली. सातशेपेक्षा जास्त बचत खाती या दिवशी उघडण्यात आली. 12 ऑक्टोबर रोजी टपाल जीवन विमा दिनानिमित्ताने पनवेल हेड पोस्ट ऑफिस येथे ग्राहकांसाठी माहितीपर काउंटर सेवा उपलब्ध करून देण्यात आली, तसेच ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ऑनलाइन माहिती शिबिराचे आयोजन करण्यात आले. डाक जीवन विमा पॉलिसींच्या मॅच्युरिटी, तसेच मृत्यू दाव्यांचे निवारण व धनादेश वाटप या दिवशी करण्यात आले. 13 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय फिलँटेली दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन प्रश्‍नमंजुषा पनवेल विभागीय कार्यालयामार्फत आयोजित करण्यात आली. 14 ऑक्टोबर रोजी व्यवसायवृद्धी दिवस साजरा करण्यात आला. या निमित्ताने नवी मुंबई डाक विभागाच्या कार्पोरेट ग्राहकांची ऑनलाइन सभा आयोजित करण्यात आली. 15 ऑक्टोबर रोजी डाक (मेल्स) दिवसाच्या निमित्ताने नागरिकांसाठी ‘नो युअर पोस्टमन’ हा उपक्रम राबविण्यात आला, तसेच त्वरित टपाल वितरणासाठी कर्मचार्‍यांना मार्गदर्शन केले. हे उपक्रम राबविताना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात आले.