नियम न पाळणार्‍यांकडून 20 दिवसात 10 लाख दंड वसूल

कोविड प्रतिबंधात्मक उपायाचे उल्लंघन ; महापालिकेची कारवाई  

नवी मुंबई ः लॉकडाऊनमधील बंदी टप्प्याटप्प्याने खुली केली जात असताना सुरक्षेच्या या त्रिसूत्रीचा काटेकोर वापर करणे गरजेचे बनले आहे. मात्र नियमांचे उल्लंघन करणार्‍या नागरिकांकडून दंडात्मक वसूली करण्याची धडक कार्यवाही करण्यात येत आहे. एप्रिल महिन्यापासून सप्टेंबरपर्यंत अशा कारवाईतून 35 लक्ष रक्कमेहून अधिक दंड वसूल करण्यात आलेला आहे. तर 1 ते 20 ऑक्टोबरपर्यंत 20 दिवसांत 10 लाख, 800 रूपये इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे. 

मागील आठवड्यापासून नवी मुंबई महानगरपालिका कोरोनाबाधितांच्या संख्येपेक्षा कोरोनावर मात करीत बरे होऊन घरी परतणार्‍या नागरिकांची संख्या वाढलेली दिसत आहे. कोरोनामुक्त व्यक्तींचे प्रमाण 91 टक्के झालेले असून 6.52 टक्के कोरोनाबाधित व्यक्ती उपचार घेत आहेत. ही आकडेवारी काहीशी दिलासाजनक असली तरी सध्याचा उत्सव कालावधी पाहता सतर्क राहणे गरजेचे आहे. कोरोनावर ठोस औषध सापडेपर्यंत मास्कचा वापर, हातांची स्वच्छता आणि सुरक्षित अंतर हीच कोरोनापासून बचावाची आयुधे आहेत. त्यामुळे या तिन्ही गोष्टींचा प्रत्येक नागरिकाने दैनंदिन व्यवहारात उपयोग करण्याविषयी विविध माध्यमांतून सतत जनजागृती केली जात आहे. आता लॉकडाऊनमधील बंदी टप्प्याटप्प्याने खुली केली जात असताना तर सुरक्षेच्या या त्रिसूत्रीचा काटेकोर वापर करणे गरजेचे बनले आहे. त्यामुळे जे नागरिक बेजबाबदारपणे वागून स्वत:सह इतरांनाही कोरोना संसर्गाच्या धोक्यात आणताहेत अशा नियमांचे उल्लंघन करणार्‍या नागरिकांकडून दंडात्मक वसूली करण्याची धडक कार्यवाही करण्यात येत आहे. एप्रिल महिन्यापासून सप्टेंबरपर्यंत अशा कारवाईतून 35 लक्ष रक्कमेहून अधिक दंड वसूल करण्यात आलेला आहे. नागरिकांना नियम पालनाची जाणीव व्हावी तसेच दंडात्मक रक्कमेतून समज मिळावी याकरिता महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार विभाग कार्यालय स्तरावर विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांमार्फत सुरूवातीच्या काळात नियम मोडणार्‍या नागरिकांना गुलाबाचे फुल देऊन त्यांचे प्रबोधनही करण्यात आले. अशा सार्वजनिक आरोग्य हिताला बांधा आणणार्‍या नागरिकांवरील कारवाईतून 1 ते 20 ऑक्टोबरपर्यंत 20 दिवसांत 10 लाख, 800 रूपये इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे. यामध्ये पुढील प्रमाणे दंड वसूली करण्यात आली.

मास्क न लावणार्‍या 1172 व्यक्तींकडून रू. 5 लक्ष 86 हजार
सुरक्षित अंतर न पाळणार्‍या 1444 व्यक्ती यांचेकडून रू. 2 लक्ष 88 हजार 800
सुरक्षित अंतर न पाळणार्‍या 63 व्यापारी, दुकानदार यांचेकडून रू. 1 लक्ष 26 हजार
अशाप्रकारे एकूण 10 लक्ष 800 रूपये इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे.


एपीएमसी मार्केट परिसरात महानगरपालिकेच्या विशेष दक्षता पथकांनी केलेली दंडवसूली 
मास्क न लावणार्‍या 142 व्यक्तींकडून रू. 71 हजार
सुरक्षित अंतर न पाळणार्‍या 269 व्यक्ती यांचेकडून रू. 53 हजार 800
सुरक्षित अंतर न पाळणार्‍या 4 व्यापारी, दुकानदार यांचेकडून रू. 8 हजार
अशाप्रकारे एकूण 1 लक्ष 32 हजार 800 रूपये इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे.


अशाप्रकारे होते दंडवसूली
सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्‍या व्यक्तीकडून रू. 1 हजार, मास्क न लावणार्‍या व्यक्तीकडून रू. 500, सुरक्षित अंतर न पाळणार्‍या व्यक्तीकडून रू. 200 व सुरक्षित अंतराचे नियम मोडणार्‍या व्यापारी/दुकानदार यांचेकडून रू. 2 हजार अशाप्रकारे दंड वसूल केला जात आहे. यानुसार 29 एप्रिलपासून आत्तापर्यंत 45 लक्ष रक्कमेहून अधिक दंड वसूल करण्यात आलेला आहे.