‘यांच्यावर’ आता विशेष भरारी पथकांचा वॉच

मास्क, सोशल डिस्टन्सींगचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई

नवी मुंबई ः आरोग्य सुरक्षेच्या नियमांचे पालन न करणार्‍या बेजबाबदार नागरिकांवर महानगरपालिकेच्या विभाग कार्यालय स्तरावरील दक्षता पथकांमार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. गर्दीत कोरोना प्रसाराचा धोका लक्षात घेऊन याबाबत दक्षता राखत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक विभाग कार्यालय क्षेत्रासाठी स्वतंत्र विशेष भरारी पथक नियुक्त करण्यात आलेले आहे.

कोव्हीड 19 साथरोगावर अद्याप लस उपलब्ध नसल्याने मास्क, सुरक्षित अंतर आणि हात धुणे हीच बचावाची त्रिसूत्री असल्याने आरोग्य सुरक्षेच्या या नियमांचे पालन न करणार्‍या बेजबाबदार नागरिकांवर महानगरपालिकेच्या विभाग कार्यालय स्तरावरील दक्षता पथकांमार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. या माध्यमातून दंडात्मक रक्कम वसूलीपेक्षा नियमांचे उल्लंघन करणार्‍या नागरिकांना समज मिळावी ही भूमिका आहे. अशा प्रकारच्या कारवाईतून आत्तापर्यंत 48 लाखाहून अधिक दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे. मागील 15 दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट होत असल्याचे दिसून येत आहे. ही बाब दिलासाजनक असली तरी कोरोना हा संसर्गातून पसरणारा रोग असल्याने जोपर्यंत लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत अतिशय जबाबदारीने काळजी घेण्याची गरज आहे. त्यामध्ये आगामी कालावधी हा उत्सवांचा आहे. विशेषत्वाने दिवाळी हा सर्वात मोठा सण असल्याने नागरिक विविध प्रकारच्या खरेदीसाठी घराबाहेर पडून बाजारपेठांमध्ये गर्दी होण्याचा संभव आहे. अशा गर्दीत कोरोना प्रसाराचा धोका लक्षात घेऊन याबाबत दक्षता राखत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक विभाग कार्यालय क्षेत्रासाठी स्वतंत्र विशेष भरारी पथक नियुक्त करण्यात आलेले आहे. विभाग कार्यालयांतील दक्षता पथके आपली दंडात्मक कामगिरी करीत आहेतच. त्यांच्या जोडीला ही 8 विभाग कार्यालयनिहाय 8 विशेष भरारी पथके आरोग्य सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणार्‍या व्यक्तींविरोधातील कारवाईला अधिक बळ देणार आहेत.

या विशेष भरारी पथकांमध्ये महानगरपालिकेच्या दोन कर्मचार्‍यांसह दोन पोलीसही असणार आहेत. या विशेष भरारी पथकांमध्ये पोलीसांचा समावेश असल्याने मास्क, सोशल डिस्टन्सींग उल्लंघनाविषयीची कारवाई अधिक प्रभावीपणे केली जाणार आहे. या आठही पथकांना विभाग कार्यालय क्षेत्रात फिरण्यासाठी स्वतंत्र वाहन देण्यात आले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचा या कारवाईमागील उद्देश दंडात्मक वसूली करणे हा नसून नागरिकांनी आरोग्य सुरक्षा नियमांचे पालन करावे व यामधून आपल्या स्वत:चे आणि आपल्या संपर्कातील इतरांचे कोव्हीड 19 च्या विषाणूपासून रक्षण करावे हे आहे. काही बेजबाबदार नागरिकांमुळे आरोग्य सुरक्षा नियमांचे पालन करणार्‍या नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहचू नये ही मुख्य भूमिका आहे.