पंतप्रधान स्वनिधी योजनेस नवी मुंबईत जोरदार प्रतिसाद

नवी मुंबई ः कोरोना संक्रमणाच्या काळात आर्थिक मंदीचा सर्वात जास्त फटका पदपथ विक्रेता व किफायतीदरात घरपोच सेवा देणार्‍या गरीब लोकांना बसला आहे. या वर्गाला कोरोना नंतरच्या काळात सावरता यावे म्हणून केंद्र सरकारने पदपथ विक्रेता स्वावलंबन योजना सुरु केली असून हा वर्ग आत्मनिर्भर  करण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. ही योजना स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत राबविली जात असून नवी मुंबईत या योजनेस जोरदार प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. 

पदपथ विक्रेता व घरपोच सेवा देणार्‍या वर्गाला आत्मनिर्भर करण्यासाठी शासनाने  10 हजार रुपये राष्ट्रीयकृत बँका व मल्टीस्टेट सहकारी बँकामार्फत कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना राबविण्याची जबाबदारी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आली असून संबंधित संस्थांनी अशा पदपथ विक्रेता व घरपोच सेवा देणार्‍या गरीब लोकांचे अर्ज भरुन ते संबंधित व्यक्तिच्या जवळील बँकेकडे पाठवायचे आहेत. नवी मुंबई महापालिकेने याबाबत स्वतंत्र सेवा केंद्र बेलापुर येथील जुन्या महापालिका कार्यालयात सुरु केले असून दररोज 400 ते 500 अर्ज या योजनेअंतर्गत भरुन पाठवले जात आहेत. 

या योजनेत संबंधित पदपथ विक्रेता व घरपोच सेवा देणार्‍या व्यक्तीस दहा हजार रुपयांचे कर्ज देण्यात येणार असून त्याला महिन्याला 946 रुपये पुढील 12 महिने भरावे लागणार आहेत. यासाठी 7 टक्के व्याजात सूट देण्यात आली असून कर्ज व्यवस्थित परतफेड केल्यास 1200 रुपये कॅशबॅकही संबंधित व्यक्तीला मिळणार आहे. पदपथ विक्रेता व घरपोच सेवा व्यक्तींना कर्ज घेण्याची व त्याची परतफेड करण्याची सवय होऊन संबंधित बँकेत त्यांची चांगली पत तयार करणे हा या योजनेमागील हेतु आहे. शिवाय जे कर्ज धारक वेळेवर कर्ज परतफेड करतील त्यांना 50 हजारांपर्यंत विनातारण कर्ज देण्याची सवलत या योजनेत आहे. या कर्जाला केंद्र सरकारने काऊंटर गॅरेंटी दिल्याने बँकांचे पैसेही सुरक्षित राहणार आहेत. समाजात छोटेछोटे कर्ज घेऊन ते फेडण्याची सवय गरीब वर्गाला लागली तर बँकांकडे कोट्यावधी लोकांचा एक वर्ग कर्ज देण्यासाठी उपलब्ध होेईल व बँकेला कोट्यावधी रुपयांचे व्याज मिळेल. या योजनेला पदपथ विक्रेता व घरपोच सेवा व्यक्ती कसा प्रतिसाद देतात यावर या योजनेचे भविष्य अवलंबून आहे.