नवी मुंबईत कोरोना बाधितांमध्ये लक्षणीय घट
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 02, 2020
- 724
कोरोनामुक्तीचे प्रमाण 93.90 % ; मृत्यूदर 2.02 % ; डबलिंग रेट 239 दिवस
नवी मुंबई ः नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 31 ऑक्टोबरपर्यंत एकूण 44521 कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून त्यापैकी 41803 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत व 901 रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत नवी मुंबईतील कोरोनामुक्त होण्याचे 93.90 % हे प्रमाण आणि मृत्यूदराचे 2.02 % हे प्रमाण सर्वाधिक आहे. ‘मिशन ब्रेक द चेन’ संकल्पनेची अंमलबजावणी अत्यंत प्रभावी रितीने केल्याने व एखादा रूग्ण सापडल्यानंतर त्याच्या संपर्कातील व्यक्ती शोधून त्यांची तपासणी करण्याचे प्रमाण 24 व्यक्ती इतके चांगले ठेवल्याने आता रुग्णसंख्येत घट झाल्याचे दिसत आहे.
महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी गांभीर्याने लक्ष देत ‘मिशन ब्रेक द चेन’ मोहीम अधिक तीव्रतेने राबविली. त्याला शासनाच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या राज्यस्तरीय विशेष अभियानाची 15 सप्टेंबरपासून जोड मिळाली आणि या मोहिमांची रूग्णशोध, तपासणी आणि उपचार ही उद्दिष्टांची त्रिसूत्री समान असल्याने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात अभियांनाची प्रभावी रितीने अंमलबजावणी करण्याकडे आयुक्तांनी स्वत: काटेकोर लक्ष दिले. राज्यातील महानगरपालिकांमध्ये नवी मुंबईने उल्लेखनीय काम करण्याची नोंद घेण्यात आली. त्यासोबतच कोव्हीड 19 चाचण्यांच्या संख्या वाढीवरही भर देण्यात आला. सप्टेंबर महिन्यात 68357 चाचण्या करण्यात आल्या होत्या, त्यांची संख्या वाढवित ऑक्टोबर महिन्यात 84062 इतक्या चाचण्या करण्यात आल्या. आत्तापर्यंत एकूण 2 लक्ष 81 हजार 867 इतक्या टेस्ट करण्यात आल्या असून लोकसंख्येच्या तुलनेत चाचण्यांचे हे प्रमाण इतर मोठ्या शहरांपेक्षा अधिक आहे. सध्या दररोज 2600 ते 2800 चाचण्या करण्यात येत आहेत. ऑक्टोबर महिन्यात 84062 चाचण्या करण्यात आल्या असून त्यामध्ये 7848 व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. सप्टेंबर महिन्यातील चाचण्यांमध्ये कोरोनाबाधित आढळण्याचे प्रमाण (पॉझिटिव्हिटी रेट) 15.39% इतके होते. त्यात घट होऊन ते प्रमाण देखील ऑक्टोबर महिन्यात 9.33% इतके कमी झाल्याचे दिसून आले.
ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपासून कोरोनातून बरे होणार्या रूग्णांचे प्रमाण सतत वाढत गेलेले आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस 32325 रूग्ण बरे होऊन घरी परतले होते (88.14 %) हे प्रमाण लक्षणीयरित्या वाढत जाऊन ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस 41803 रूग्ण बरे होऊन घरी परतले (93.90 %) आहेत. त्याचप्रमाणे रूग्णसंख्येची वाढही नियंत्रणात दिसत आहे. त्यामुळे 30 सप्टेंबर पर्यंत 79 दिवसांवर असलेला रूग्णदुपटीचा कालावधीही 31 ऑक्टोबरपर्यंत आता 239 दिवसांवर पोहचलेला आहे. तसेच मृत्यूदरातही घट झालेली दिसत आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आत्ता 31 ऑक्टोबर रोजी 1817 (4.08 %) इतकेच कोरोनाबाधित रूग्ण उपचार घेत अॅक्टिव्ह असून 30 सप्टेंबरच्या तुलनेत (3598 रूग्ण, 9.81 %) प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या रूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झालेली आहे. 24 जून रोजी अक्टिव्ह रूग्णसंख्येने 2 हजाराची मर्यादा (2127) ओलांडलेली होती ती 28 ऑक्टोबरपासून पुन्हा 2 हजाराच्या खाली आलेली आहे. एका बाजूला नव्याने कोरोना बाधित होणा-यांच्या संख्येतील घट आणि दुसर्या बाजूला बरे होणार्यांच्या प्रमाणात होत असलेली वाढ यामुळे शहरातील कोव्हीड उपचारार्थ असलेले बेड्स रिकामे असल्याचे चित्र दिसत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या डॅशबोर्डवरील बेड्सची आकडेवारी तपासली असता एकूण 6073 बेड्सपैकी 4396 बेड्स उपलब्ध असल्याचे दिसत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai